Vidhan Sabha 2019: युतीत RPI ला मिळाल्या 'या' 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 17:07 IST2019-10-02T17:05:25+5:302019-10-02T17:07:42+5:30
तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. रिपाइंसाठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत.

Vidhan Sabha 2019: युतीत RPI ला मिळाल्या 'या' 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी,तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइंला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजय सिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र त्यांनी माळशिरस मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
आरपीआयच्या 4 उमेदवारांच्या नावाची घोषणाही रामदास आठवलेंनी केली. यामध्ये मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मधून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, फलटणमधून दिपक निकाळजे, पाथरीमधून आमदार मोहन फड तर नायगावमधून राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माळशिरस, भंडारा या दोन जागांची नावे लवकरच जाहीर करु असं आठवलेंनी सांगितलं आहे.
तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. रिपाइंसाठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यानुसार नांदेड मधील भाजपचे नेते राजेश पवार यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिली आहे. तसेच परभणीचे भाजप नेते आमदार मोहन फड यांनी रिपाइं मध्ये प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी पाथरी विधानसभा मतदारसंघातून देण्यात आली आहे.
मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे तरी शिवसेनेने सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा रिपाइंला सोडायला हवी. याबाबत शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ रिपाइं ला सोडण्यात आला असून शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून रिपाइंचे अधिकृत उमेदवार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.