मुंबई : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या बराच वेळ चर्चा झाल्याचे समजते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या तयारीचा वेग वाढला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या मतदारसंघाच्या निर्मितीपासून निम्मा कालावधी अचलपुरात अपक्ष उमेदवारांनी नेतृत्व केले आहे.
बच्चू कडू अचानक मातोश्रीवर गेल्याने शिवबंधन हाती बांधतात की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, यावर बच्चू कडू यांनी खुलासा केला आहे. माझा सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. मी फक्त प्रहार या संघटनेच्या कामासंदर्भात चर्चा केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये इनकमिंग सुरू असतानाच आमदार बच्चू कडू हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.