शिवसेनेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचा व्हिडीओ?; नकली हिंदुत्ववादी, मनसेचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:00 IST2022-05-11T14:00:35+5:302022-05-11T14:00:57+5:30
मागील काही दिवसांपासून भाजपा-मनसे सातत्याने हिंदुत्वावरून शिवसेनेला टार्गेट करत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना उत्तर देण्यासाठी १४ मे रोजी मुंबईत सभेचं आयोजन केले आहे.

शिवसेनेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचा व्हिडीओ?; नकली हिंदुत्ववादी, मनसेचा टोला
मुंबई – राज्यात भोंग्याच्या प्रश्नावरून शिवसेना-मनसे(Shivsena-MNS) आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे अन्यथा हनुमान चालीसा लावू असा इशारा सरकारला दिला होता. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सत्ताधारी शिवसेनेची अडचण झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून सत्ता आणल्यानंतर शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विसर पडल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपा-मनसे सातत्याने हिंदुत्वावरून शिवसेनेला टार्गेट करत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना उत्तर देण्यासाठी १४ मे रोजी मुंबईत सभेचं आयोजन केले आहे. या सभेचे टीझर प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र शिवसेनेच्या सभेच्या टीझरमध्ये चक्क राज ठाकरेंच्या सभेचे फोटो वापरण्यात आल्याचं समोर आले आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरून याबाबत दावा करत शिवसेनेच्या ट्विटचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत.
याबाबत गजानन काळे म्हणाले की, असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का..? असा सवाल करत लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली हे नकली हिंदुत्ववादी आहेत असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 11, 2022
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची...अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की...नकली हिंदुत्ववादी pic.twitter.com/LVKtoq7e6t
‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व
१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता त्यांनी एक पोस्टरही जारी केलं आहे.
शिवसंपर्क अभियान..
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) May 10, 2022
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई
यायलाच पाहिजे.. pic.twitter.com/k8gHas17fM