Join us

VIDEO: मीरा-भाईंदरमध्ये वातावरण तापलं! संदीप देशपांडे, सरदेसाई लोकलमधून मोर्चासाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:20 IST

परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आता मुंबईतूनही मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मीरारोडच्या दिशेनं निघाले आहेत.

मुंबई

परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आता मुंबईतूनही मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मीरारोडच्या दिशेनं निघाले आहेत. मराठी भाषिकांनी काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्याने आणि मनसेच्या नेत्यांना पहाटेच स्थानबद्ध करण्यात आल्याने प्रकरण चिघळलं. पोलिसांच्या या भूमिकेवर टीका करत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आता राज्यभरातून मराठी माणूस मीरा रोडच्या दिशेनं निघेल असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता स्वत: संदीप देशपांडे आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी लोकलनं मीरारोडच्या दिशेनं निघाले आहेत. 

मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मोर्चाला सुरुवातीला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. १० वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली आहे. 

मोर्चात आता मनसेचे विविध नेते सामील होऊ लागले आहेत. मनसे नेते अभिजित पानसे देखील मोर्चात सहभागी झाले आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळ मोर्चा पोहोचला असून प्रचंड गर्दी स्टेशन परिसरात झाली आहे. या मोर्चावेळी आंदोलकांनी मराठीचा जयघोष करत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेनितीन सरदेसाई