Join us  

Video:"तुम लाख कोशिश कर लो..."; धनंजय मुंडेंचा तो व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

By मुकेश चव्हाण | Published: January 16, 2021 9:00 AM

गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चर्चेत आल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई:  सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. मात्र रेणू शर्मावर आणखी काही लोकांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं, परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली, कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय असं सांगितलं. 

कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी रेणू शर्मावर केलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चर्चेत आल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एक शायरीच्या माध्यमातून लोकांना साद घालताना दिसून येत आहे. ''तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ, असं धनंजय मुंडे या व्हिडिओमध्ये बोलताना दिसून येत आहे. 

‘तुमची इच्छा असेल तर मी माघार घेते'

मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार तरुणीही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिच्यावर केलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने केले आहे.

‘मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

तरुणीच्या वकिलांना धमकीचे कॉल

तरुणीचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत तरुणीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. तसेच आपल्याला धमकीचे कॉल येत असल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांना मिळाले अभय-

धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतलीय, असे काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,' असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

टॅग्स :धनंजय मुंडेभाजपासोशल व्हायरलराष्ट्रवादी काँग्रेसपोलिसबलात्कार