निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:27 IST2025-10-08T18:27:24+5:302025-10-08T18:27:45+5:30
जोगेश्वरीत कामावर निघालेल्या २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
Mumbai Accident: मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेत आज सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून वीट खाली पडून एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जोगेश्वरीच्या मजासवाडी येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील मजासवाडी परिसरात गांधी नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या एका उंच इमारतीवरून सिमेंटचा एक ब्लॉक थेट तरुणीच्या डोक्यात कोसळला.
सकाळी ९:३० च्या सुमारास कामासाठी जात असलेल्या संस्कृती अमीन या तरुणीच्या डोक्यावर हा ब्लॉक पडला. यामुळे तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ती जागीच कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संस्कृतीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या इमारतीच्या बांधकामस्थळी सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेली नव्हती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळेच हा अपघात झाला आणि तरुणीला जीव गमवावा लागला, असे त्यांचे म्हणणे आहे. संस्कृतीच्या वडिलांनी संबंधित बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, अभियंते आणि सुपरवायझर यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
संस्कृती जोगेश्वरी पूर्वेच्या मजासवाडी येथे आई वडिलांसह राहत होती. तिच्या वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृतीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता. गेल्या काही दिवसांपासून ती गोरेगाव पश्चिम येथील एका खासगी बँकेत कामाला जात होती. आजही ती सकाळी नेहमीप्रमाणे वाजता कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र वाटेतच झालेल्या भीषण अपघाताने संस्कृतीचा जीव गेला.