Join us

माझा ATM पिन घे, 'त्याच्या' शेवटच्या फोनमधून दिसली कुटुंबाची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 09:55 IST

अब्दुलच्या शेवटच्या फोनमधून त्याची कुटुंबाबद्दलची काळजी दिसून आली.

मुंबई- गोरेगाव पश्चिम येथिल स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘टेक्निक प्लस’ या ९ मजली इमारतीला रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये अब्दुल राकीब या तरूणानेही आपला जीव गमावला आहे. पण मृत्यूपूर्वी अब्दुलने केलेलं एक काम सगळ्यांनाच भावनिक धक्का देणारं आहे. 'माझा ATM पिन घे', असं सांगणारा फोन अब्दुलने त्याच्या भावाला केला होता. अब्दुलच्या शेवटच्या फोनमधून त्याची कुटुंबाबद्दलची काळजी दिसून आली. साकी नाका येथे राहणाऱ्या अब्दुल राकीबचा मृतदेह सातव्या मजल्यावरील इलेक्ट्रिक रूममध्ये सापडला. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे.

अब्दुल राकीब फक्त 23 वर्षांचा होता. ‘टेक्निक प्लस’मध्ये लागलेल्या आगीच्या कचाट्यात सापडून त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूच्या आधी अब्दुलने त्याच्या भावाला फोन करून एटीएमचा पिन देण्याचा प्रयत्न केला. मृत्यूनंतर कुटुंबाला एटीएममधून पैसे काढता यावे, यासाठी अब्दुलने भावाला फोन केला. शेवटच्या क्षणीही अब्दुलला कुटुंबाबद्दल असलेली काळजी दिसून आली. 

अब्दुलसह इतर सहकारी ‘टेक्निक प्लस’च्या सातव्या व आठव्या मजल्यावरील ऑफिसेसची सफाई करत होते त्याच वेळी ही आग लागली. त्या मजल्यावर असलेल्या काही जणांना पळून जाता आलं पण अब्दुल मात्र आगीच्या कचाट्यात सापडला. जीव वाचविण्याच्या कुठलीही शक्यता नसल्याचं अब्दुलच्या लक्षात आल्यावर अब्दुलने त्याचा मोठा भाऊ तौफीलला फोन केला. 'मी आगीत अडकलो आहे. स्वतःला आता वाचविता येणार नाही. माझा एटीएमचा पिन लिहून घे व अकाऊंटमधून पैसे काढून माझ्या कुटुंबाला दे', असं तो तौफलीबरोबर फोनवर बोलला. 

दोघांमध्ये हे संभाषण सुरू असताना तौफीलने त्याला खचून न जाण्याचं सागितलं. 'मी एटीएम पिन घेणार नाही. तू स्वतःला वाचविण्याचा रस्ता शोध. तेथे खिडकी असेल तर उडी मारण्याचा प्रयत्न करं, असं अब्दुलला सांगितल्याचं तौफील म्हणाला. 

टॅग्स :आगअपघात