Vesave Koliwada waiting for the memorial of freedom fighters | स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाच्या प्रतीक्षेत वेसावे कोळीवाडा

स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाच्या प्रतीक्षेत वेसावे कोळीवाडा

मनोहर कुंभेजकर

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून ७ किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला  ऐतिहासिक महत्व आहे. १५० वर्षे देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी हिरीरीने भाग घेतला होता. मात्र, ७४ व्या स्वातंत्र्यदिन उद्या देशात थाटात साजरा होत असताना येथील ११४ स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक अद्याप उभारले नसल्याची वेसावकरांची खंत आहे.

 येथील सुमारे ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊन तुरुंगवास देखील भोगला. त्यामध्ये येथील कोळी महिलांनीही सहभाग घेतला होता. भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची येथील समुद्रकिनारी ११ नोव्हेंबर १९४५ साली विराट जाहिर सभा झाली होती. त्यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू असतील अशी घोषणा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी केली होती, अशी माहिती कोळी समाजाचे गाढे अभ्यासक भगवान भानजी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत पोशा नाखवा यांना तर ब्रिटीशांनी "टायगर ऑफ वर्सोवा"अशी उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने यारी रोड येथे पालिकेची शाळाही आहे. वेसाव गावातील अँड.शांताराम वेसावकर, हिराजी मोतिराम चिखले, गोपीनाथ कास्कर, मंजुळाबाई नामदेव वेसावकर, भालचंद्र तेरेकर, हिराबाई घुस्ते, हरिश्चंद्र घुस्ते, मोतीराम शेंडे यांच्यासह एकूण ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेत्रदीपक कामगिरी केली होती. आज एकही स्वातंत्र्य सैनिक हयात नाहीत. मात्र, आजही ७४ व्या स्वातंत्र्यदिनी येथील ११४  स्वातंत्र्य सैनिकांचे साधे स्मारक वेसावे गावात नाही, अशी खंत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय  यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. 

आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना त्यांची महती समजावी यासाठी येथील स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक येथील सुमुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीच्या ४५०० चौफूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे, अशी मागणी येथील माजी नगरसेवक  दिवंगत मोतीराम भावे यांनी केली होती याची  आठवण त्यांचे चिरंजीव व वर्सोवा भाजपा मंडल अध्यक्ष पंकज भावे यांनी दिली. येथील स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक येथील सुमुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीच्या ४५०० चौफूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे. १९७८ ते १९९२ पर्यंत नगरसेवक असलेले झुंजार मच्छीमार नेते दिवंगत मोतीराम भावे यांच्या प्रयत्नाने वेसावकरांना समुद्रकिनारी स्मशानभूमी मिळाली. सध्या ४५०० चौमीटर जागेवर सदर स्मशानभूमी ऊभी असून उर्वरित ४५०० चौमीटर जागेवर पालिकेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण झाले आहे. या जागेत स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक झाले पाहिजे ही वेसावकरांची जुनी मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली. 

वेसावे गावातील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत  विष्णू राघो कोळी (टेलर) यांचे २०१७ साली  त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले होते . वेसाव्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांपैकी शेवटचा बुरुज ढासळला होता अशी माहिती वेसाव्यातील मोहित रामले यांनी दिली. आजच्या तरुण पिढीला येथील स्वातंत्र्य सैनिकांची महती समजण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन व महापालिकेने ठोस प्रयत्न केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vesave Koliwada waiting for the memorial of freedom fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.