लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून विधानसभेत मंत्री नितेश राणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झडली.
राज्यपालांच्या अभीभाषणाच्या चर्चेत बोलताना रोहित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कोरटकर एवढा मोठा कधी झाला?, सरकार त्याच्या घराला सुरक्षा देते. तो मध्य प्रदेशात पळून जातो. राहुल सोलापूरकरवरही सरकारने कारवाई केली नाही, उलट पुणे महापालिकेत पदावर घेऊन बक्षीस दिले. सीबीआय, ईडीने मोतेवार यांच्या जप्त केलेल्या गाड्या कोरटकर वापरतो. यावर आता सीबीआयने कारवाई केली.
दिल्लीत बसून सीबीआय कारवाई करते, मात्र आपले सरकार कारवाई करत नाही, रोहित पवार असे म्हणताच मंत्री नितेश राणे यांनी याला आक्षेप घेतला. याप्रकरणी सरकारकडून कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांवरही कारवाई सुरू असून, पवार हे सभागृहात चुकीची माहिती देत असल्याचे नितेश राणे म्हणाले.
महाराजांना जाणता राजा बोलू नका, हे कोण म्हणाले होते, हे आपल्या आजोबांना जाऊन विचारा, औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज झाले, असे जितेंद्र आव्हाड बोलतात, यांचा राहुल गांधी जयंतीच्या दिवशी महाराजांना श्रद्धांजली वाहतो आणि हे आम्हाला शिकवणार का? असा सवाल नितेश राणे यांनी केला.
त्यावर कोरटकर, सोलापूरकर वर कारवाई झालीच पाहिजे, असे म्हणत तुमच्या घरापर्यंत जात नाही, माझ्या आजोबांबद्दल काय बोलताय, असा सवाल रोहित पवार यांनी राणे यांना विचारला. आता या शाब्दिक चकमकीवरून आणखी काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.