सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:21 IST2025-09-02T08:19:22+5:302025-09-02T08:21:37+5:30

न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई सोडण्याचे आवाहन केल्यानंतर सीएसएमटी स्थानकातील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली.

Vehicles finally ply through CSMT area after two days | सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने

सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनीही आंदोलकांना आझाद मैदान येथे थांबा, वाहने पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेतच उभी करा, पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करा, असे आवाहन केले. पोलिसांनीही मराठा आंदोलनाच्या समन्वयकांच्या मदतीने रात्री पावणेआठ पासून सीएसएमटी समोरील बंद झालेली दक्षिण मार्गिका मोकळी करण्यास सुरुवात केली. याला आंदोलकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून आला. मात्र, दोन दिवसांनी या मार्गाने हळूहळू वाहने धावू लागली.

राज्यात अशा आंदोलनांचा अनुभव पोलिस दलाला असूनही, बळाचा वापर टाळत पोलिसांनी संयम राखून गर्दीचे नियोजन करत आहे. सीएसएमटी परिसरात कडेकोट बंदोबस्त असून, पोलिस आणि आंदोलन समन्वयक यांच्यात सतत संवाद सुरू आहे. आझाद मैदान परिसरात स्पीकर लावून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. 

समन्वयकांची विनंती 
आंदोलन समन्वयकांनी सोमवारी रात्री आठ वाजता आवाहन करत, एका तासात आझाद मैदान, सीएसएमटी, पालिका मुख्यालय आवारातील सर्व वाहने हटवून रस्ता मोकळा करण्याची सूचना जरांगे यांच्या वतीने दिल्या. मात्र हे आवाहन काहींनी ऐकले तर काहींनी वाहने न हटवता तेथेच तळ ठोकणे पसंत केल्याचे दिसून आले. तरीही पोलिसांनी दक्षिण मार्गिका सुरू केली आहे.  

समोसा खातानाचा व्हिडीओ 
मनोज जरांगे-पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात उपोषणस्थळी जरांगे पाटील हे समोसा खात असताना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ एआयचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल केली जाणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

विसर्जनस्थळी बंदोबस्त
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन स्थळाच्या ठिकाणीही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जनानंतर मूर्तींच्या अवशेषांचे कोणीही फोटो, व्हिडीओ काढून प्रसारित करू नये, असे आदेश सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी जारी केले. 

Web Title: Vehicles finally ply through CSMT area after two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.