Join us  

Veer Savarkar: वीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव फेटाळला; शिवसेनेनं भाजपाचा डाव उलटवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 1:11 PM

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, शिवसेनेचं प्रत्युत्तर

ठळक मुद्देनितेश राणे यांचे मत घ्या, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगासावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन शिवसेनेचा भाजपाला टोला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मागणी

मुंबई - राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजपाकडून वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र हा प्रस्ताव फेटाळल्याने नाराज झालेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काँग्रेसच्या मासिकात वापरण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शिदोरी मासिकावरही बंदी घालावी आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा अशी मागणी करण्यात आली. या प्रस्तावावरुन भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

तर शिवसेनेने भाजपाचा डाव त्यांच्यावर उलटवून लावला. भाजपाने ज्या प्रस्तावाची मागणी केली आहे. त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, यावर नितेश राणे यांचे मत घ्या, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा असा टोला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी लगावला

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य सरकारने यापूर्वी केंद्र सरकारला पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप केंद्राने ही मागणी पूर्ण केली नाही. केंद्रात भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे यासाठी प्रयत्न करावेत, आम्हीही प्रयत्न करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, वारंवार भाषणामधून देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या मासिकात जो उल्लेख केला आहे. त्यातील सावरकरांबद्दल मजकूर वाचून दाखवत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताय असा चिमटा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

संपूर्ण राज्यभरात भाजपाकडून वीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. पण शिवसेनेचं सावरकर प्रेम किती खरं आहे हे आज कळेल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विधानसभेत शिवसेनेने वीर सावरकरांच्या अभिमानाचा प्रस्ताव आणावा अशी मागणी भाजपाने केली, मात्र भाजपा सरकार असताना सावरकर यांच्याबद्दल प्रस्ताव का आणला नाही असं विचारताच आमच्या काळात सावरकरांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यामुळे तेव्हा गरज पडली नाही असं त्यांनी सांगितले. मात्र शिवसेनेचं सावरकरांवर किती प्रेम आहे की, फक्त सन्मानाच्या नावाखाली ढोंग करतेय हे जनतेसमोर येईल असा टोला भाजपाने लगावला आहे.   

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरभाजपादेवेंद्र फडणवीसशिवसेनाअजित पवार