३१ वर्षांपूर्वी जिथे बॉम्ब निकामी केला तिथेच वसंत जाधव करणार उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 07:47 AM2024-03-11T07:47:46+5:302024-03-11T07:48:30+5:30

शासन पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या निवृत्त अधिकाऱ्याचा इशारा.

vasant jadhav will go on fast at the place where the bomb was defused 31 years ago | ३१ वर्षांपूर्वी जिथे बॉम्ब निकामी केला तिथेच वसंत जाधव करणार उपोषण 

३१ वर्षांपूर्वी जिथे बॉम्ब निकामी केला तिथेच वसंत जाधव करणार उपोषण 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मुंबईत १२ मार्च १९९३ ला झालेल्या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली. त्यापाठोपाठ १४ मार्च रोजी दादर नायगाव येथील १२ किलो वजनाचा आरडीएक्स, तसेच स्कूटरमध्ये ठेवलेला टाइमबॉम्ब निकामी करून शेकडो जणांचे प्राण वाचविणारे निवृत्त मेजर वसंत जाधव आजही पुरस्कारापासून वंचित आहेत. संबंधित यंत्रणांना ३३६ हून अधिक वेळा पत्रव्यवहार करूनदेखील प्रशासन दखल घेत नसल्याने दादर परिसरातच त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. शासनामुळे ही वेळ ओढावल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. 

जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार १९९३ मध्ये भारत सरकारच्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी यांच्या अंतर्गत मुंबई विमानतळ येथे बॉम्ब स्क्वॉडचा प्रमुख होतो. १४ मार्च १९९३ रोजी दादर येथील नायगाव क्रॉस रोड येथे जाधव यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेत १२ किलो वजनाचे आरडीएक्स व स्कूटरमध्ये ठेवलेला टाइमबॉम्ब निकामी करून शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. या घटनेआधी १२ मार्च १९९३ रोजी वरळी येथील पासपोर्ट ऑफिससमोर झालेल्या पाचव्या बॉम्बस्फोटात ते जखमीही झाले होते. तरीही माहीम येथील मच्छीमार कॉलनीसमोर अतिरेक्यांनी टाकलेला हातबॉम्ब नष्ट करून कित्येकांचे प्राण जाधव यांनी वाचविले होते. मात्र, केंद्व वा राज्य सरकारने या शौर्याची नोंद घेतली. 

शिफारस नाकारली

जाधव पुढे सांगतात की, त्यांच्याच शिफारशीवरून तीन कनिष्ठ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती व भारत सरकारने १९९४ च्या प्रजासत्ताकदिनी शौर्य पदके देऊन गौरविले; परंतु माझ्या खात्याने व मंत्रालयाने केलेली ‘राष्ट्रपतींच्या पोलिस शौर्य पथकाची’ शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने काहीही कारण न देता नाकारली. 

हा अन्याय असून, आजपर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, नागरी हवाई वाहतूकमंत्री,  सार्वजनिक तक्रार निवारणमंत्री व डीजी बीसीएएस यांना ३३६ पत्रे लिहून आपल्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याची विनंती जाधव यांनी केली. 

मात्र, अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे जाधव नमूद करतात. या सर्वांमुळेच उपोषणाचा मार्ग निवडत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
 

Web Title: vasant jadhav will go on fast at the place where the bomb was defused 31 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई