Join us

एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 17:36 IST

ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले; पण मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, त्यातून आलेली नाराजी, महाराष्ट्रभूषण समारंभातील दुर्घटना अशा काही बाबींची किनारही या कामगिरीला आहे.

वर्षपूर्तीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती दिली आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार येऊन एक वर्षे होऊन सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. हे त्यांचे अपयश आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वर्ष का लागत आहे?, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. तसेच एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार असल्याचा टोला देखील वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.

राहुल कनाल यांच्या सुरु असणाऱ्या चर्चांवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाच्या वाटेवर कोण आहे?, कोण जात आहे, हे त्यांनाच विचारा. राहुल कनाल हा माझा चांगला मित्र आहे. इतके दिवस आम्ही एकत्र काम करत होतो. सत्ता गेली म्हणून आता काहीतरी कारणे देऊन दुसऱ्या पक्षात जात आहेत, असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी संधी दिली म्हणून ते युवानेते झाले. नेते झाले म्हणून अन्याय झाला का?, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते त्याचा पाठपुरावा करावा लागतो या संदर्भातच अनेक बैठक असतात त्यामुळे केंद्र जावं लागतं असं फडणवीस म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

पुढील आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार - शिरसाट 

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठ दिवासांत होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्रात देखील फेरबदल होणार आहेत. यात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता सिरसाट व्यक्त केली.

टॅग्स :वरुण सरदेसाईमहाराष्ट्र सरकारदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे