Join us  

निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:56 AM

उत्तर मध्य मुंबईतील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्याने पूर्ण करण्याची हमी ‘न्यायपत्रा’तून महाविकास आघाडीने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मोकळ्या जागांचे संवर्धन, कुर्ला मदर डेअरी, विमानतळ फनेल झोन, लोकलमधील गर्दी, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा, तीन महिन्यांतून एकदा जनसुनवाई, गावठाण,  कोळीवाडा अशा उत्तर मध्य मुंबईतील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्याने पूर्ण करण्याची हमी ‘न्यायपत्रा’तून महाविकास आघाडीने दिली आहे.

उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार, यासाठीचे न्यायपत्र गुरुवारी सादर केले. त्याचे प्रकाशन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना चेन्नीथला यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान यांवरच बोलत आहेत. त्यांचे शिक्षण कमी असल्याने बजेटची त्यांना माहिती नाही. त्यामुळे बजेटवर ते काहीही बोलत आहेत; परंतु जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.

वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या आहेत. मुंबईकरांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करून संसदेत पाठवा, मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

तसेच गायकवाड यांच्या हमीपत्रात हाऊसिंग सोसायट्यांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबईत प्रदूषण समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यावरही भर दिला जाईल, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, सचिव बी. एम. संदीप, आमदार अमिन पटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :वर्षा गायकवाडमुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४काँग्रेस