गुजरातच्या धर्तीवर राज्यात साकारणार वनतारा प्राणिसंग्रहालय, लवकरच केंद्राकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 05:45 IST2025-03-06T05:44:09+5:302025-03-06T05:45:47+5:30

गुजरातप्रमाणे एखादे वनतारा महाराष्ट्रातही उभारा असे पत्र उद्योगपती अनंत अंबानी यांना लिहिणार.

vantara zoo to be set up in the maharashtra state on the lines of gujarat and proposal to the central govt soon | गुजरातच्या धर्तीवर राज्यात साकारणार वनतारा प्राणिसंग्रहालय, लवकरच केंद्राकडे प्रस्ताव

गुजरातच्या धर्तीवर राज्यात साकारणार वनतारा प्राणिसंग्रहालय, लवकरच केंद्राकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गुजरातमध्ये ज्या प्रकारे वन्यप्राण्यांसाठी वनतारा उभारण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही प्राणिसंग्रहालय उभारण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

गुजरातप्रमाणे एखादे वनतारा महाराष्ट्रातही उभारा असे पत्र उद्योगपती अनंत अंबानी यांना लिहिणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात वाघ आणि बिबट्यांमुळे मानव-प्राणी संघर्ष निर्माण होत असल्याच्या मुद्द्यावर विधानसभेत अनेक सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.  यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी विधानसभाध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊ, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

भंडारा लगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनलगत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार मारल्याच्या मुद्यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. 

हल्लेखोर बछड्याला जेरबंद करून निसर्गात सोडले 

भंडारा वनविभागातील अड्याळ लाखांदूर येथील मानवी वस्तीनजीक बीटी-१० या वाघिणीचा २ वर्षांच्या बछड्याने हा हल्ला केला आहे. त्याला जेरबंद करून भंडारा वनक्षेत्रातील कोका नियत क्षेत्रात सोडण्यात आल्याचे गणेश नाईक म्हणाले.  राज्यात एकूण ६१९९१.८९ चौ.कि.मी. वनक्षेत्र असून त्याचे व्यवस्थापन करण्याकरिता एकूण ११ प्रादेशिक वनवृत्त व २ वन्यजीव वनवृत्त आहेत. तसेच वन्यजीव संरक्षणाकरिता राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ वन्यजीव अभयारण्ये व २८ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. 

महाराष्ट्रात ४४४ वाघ

वर्ष २००० च्या सुमारास महाराष्ट्रात १०१ वाघ होते. आता या वाघांची संख्या वाढून ४४४ इतकी झाली असल्याचे गणेश नाईक म्हणाले. हिंस्त्र प्राण्यांचे भक्ष्य हे शाकाहारी प्राणी असतात. त्यांच्यात वाढ व्हावी, यासाठी वनक्षेत्रात रायवळ आंबा, फणस आदी फळझाडे लावण्यास वनविभागाला सांगण्यात आल्याचेही नाईक म्हणाले.

 

Web Title: vantara zoo to be set up in the maharashtra state on the lines of gujarat and proposal to the central govt soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.