वामन केंद्रे शिकवणार अभिनय व संभाषणाची जादू; श्री शिवाजी मंदिरमध्ये भरणार नि:शुल्क कार्यशाळा

By संजय घावरे | Published: April 22, 2024 05:12 PM2024-04-22T17:12:30+5:302024-04-22T17:12:40+5:30

'मॅजिक ऑफ अँक्टींग अँड स्पीच'द्वारे देणार धडे | ही कार्यशाळा १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवतांसाठी असणार आहे

Vaman Kendra will teach the magic of acting and conversation; Free workshop to be held at Shri Shivaji Temple | वामन केंद्रे शिकवणार अभिनय व संभाषणाची जादू; श्री शिवाजी मंदिरमध्ये भरणार नि:शुल्क कार्यशाळा

वामन केंद्रे शिकवणार अभिनय व संभाषणाची जादू; श्री शिवाजी मंदिरमध्ये भरणार नि:शुल्क कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कायम विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणारे नाट्य दिग्दर्शक-प्रशिक्षक, एनएसडीचे माजी संचालक, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे मुलांना 'अभिनय व संभाषणाची जादू' शिकवणार आहेत. श्री शिवाजी मंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नि:शुल्क कार्यशाळेमध्ये मुलांना हि अनोखी जादू शिकता येणार आहे.

दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या इमारतीतील राजर्षी शाहु सभागृहामध्ये २७ व २८ एप्रिल रोजी  सायंकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत 'मॅजिक ऑफ अँक्टींग अँड स्पीच'द्वारे देणार धडे अर्थात 'अभिनय व संभाषणाची जादू' या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवतांसाठी असणार आहे.

या कार्यशाळेत अभिनयाची व संभाषणाची जादू काय असते, या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी काय करावे लागते तसेच अभिनयाचे प्रकार, अभिनयाच्या शैली, भूमिकेचा अभ्यास, संभाषण म्हणजे काय? त्याचे मूळ व्याकरण, प्रभावी संभाषणाची तत्त्वे कोणती या विषयीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सिरिज, रेडिओ, व्हॅाईस ओव्हर आदि माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार दिग्दर्शनही केले जाईल. नि:शुल्क असलेल्या या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अभिनय व आवाज या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या कलावंतानी रंगपीठ द थिएटर मुंबई या जीमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन रंगपीठ थिएटर मुंबईच्या गौरी केंद्रे यांनी व छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष  ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले आहे.

प्रा. वामन केंद्रे यांचे अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्याकडे शिकून नावारूपाला आलेले शेकडो कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमात केवळ अग्रेसर नाहीत तर देशात-विदेशात दबदबा निर्माण करून कार्यरत आहेत. केंद्रे यांनी आतापर्यंत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर, मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारतभर ४०० हून अधिक कार्यशाळा घेऊन राष्ट्रीय आंतराष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडवले आहेत.

प्रा. वामन केंद्रे यांना आतापर्यंत सात राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये संगीत नाटक अकादमी दिल्ली पुरस्कार, राष्ट्रीय कालीदास सन्मान( मध्य प्रदेश ), ब. व. कारंत पुरस्कार, मनोहर सिंग स्मृती पुरस्कार( एन.एस.डी), राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान(उज्जैन) रमेश सिंग राष्ट्रीय सन्मान( पटना ) व पद्मश्री पुरस्कार ( भारत सरकार) सामील आहेत.

Web Title: Vaman Kendra will teach the magic of acting and conversation; Free workshop to be held at Shri Shivaji Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई