हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 06:51 IST2025-05-25T06:49:58+5:302025-05-25T06:51:35+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेतली.

हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैष्णवी हगवणे प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. शनिवारी एक कार, दोन पिस्तूल आणि वैष्णवीला लग्नात दिलेली चांदीची भांडी पोलिसांनी जप्त केली.
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे, तसेच वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शशांक आणि सुशील यांच्याकडील दोन पिस्तूल जप्त केले. पुणे शहर पोलिसांकडून या दोघांना पिस्तूल परवाना देण्यात आला होता. त्यामुळे पुणे शहर पोलिसांकडून या दोघांच्या पिस्तूल परवाना जप्तीची नोटीस बजावली.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये दोषींना कोणीही पाठीशी घालू नये. तसे केल्यास कोणताही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वन केले. अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेतली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पंकजा मुंडे यांनीही वाकड येथे कस्पटे कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी आहे. ज्यांनी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल, अशी माहिती मंत्री आठवले यांनी दिली.
आरोपी नीलेश चव्हाण याच्या घराची शुक्रवारी रात्री वारजे पोलिसांनी झडती घेतली. यावेळी पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे.
वैष्णवीला न्याय मिळवून देणार : मुख्यमंत्री
वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच या हृदयद्रावक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबीयांना आश्वस्त केले. फडणवीस यांनी शनिवारी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
आयोगाच्या कार्यपद्धतीवर गोऱ्हे यांनी ठेवले बोट
महिला आयोगाने मयूरी जगताप प्रकरणात पोलिसांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालविण्याचा सल्ला दिला असता, तर आतापर्यंत तिला प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. मात्र, राज्य महिला आयोगाचे काय चूक आणि बरोबर हे ‘ट्रायल बाय मीडिया’ होऊ नये. मात्र, ते जे काही काम करत आहेत, त्यात अजून काही तज्ज्ञ व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बैठका घ्याव्यात. सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणे आवश्यक आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.