युती झाल्याचे वडेट्टीवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे; ‘वंचित बहुजन’चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:23 IST2025-12-25T08:22:58+5:302025-12-25T08:23:56+5:30
एका बाजूला वंचितसोबत युतीची बोलणी करणारी काँग्रेसची समिती अजून युती झालेली नाही, असे सांगते, तर दुसऱ्या बाजूला वडेट्टीवार युती झाल्याचे सांगतात.

युती झाल्याचे वडेट्टीवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे; ‘वंचित बहुजन’चा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याचे केलेले विधान खोटे आणि दिशाभूल करणारे तसेच खोडसाळपणाचे असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
एका बाजूला वंचितसोबत युतीची बोलणी करणारी काँग्रेसची समिती अजून युती झालेली नाही, असे सांगते, तर दुसऱ्या बाजूला वडेट्टीवार युती झाल्याचे सांगतात. त्यामुळे काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे वंचितने दिलेल्या स्पष्टीकरणावरून उघड झाले आहे. या संदर्भात वंचितच्या मीडिया सेलचे प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत म्हणाले की, लोकांमध्ये एक भूमिका मांडायची आणि माध्यमांमध्ये दुसरीच माहिती देऊन संभ्रम निर्माण करायचा हा काँग्रेसचा जुनाच खेळ पुन्हा सुरू झाला आहे.
प्रत्यक्षात अद्याप कोणतीही युती जाहीर झालेली नसताना अशा प्रकारची विधाने करून जनतेची दिशाभूल केली जात आहे.
युतीचा निर्णय वरिष्ठच योग्यवेळी जाहीर करतील
काही दिवसांपूर्वी दिल्लीहून काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी व्ही. व्यंकटेश हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या भेटीत वंचित बहुजन आघाडीने युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसकडून कोणताही ठोस, अधिकृत किंवा सन्मानजनक प्रस्ताव न आल्याने युतीसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. युतीबाबत अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य वेळी अधिकृतरीत्या जाहीर करतील, अशीही माहिती पटाईत यांनी दिली.