रेल्वे स्थानकांतून वडे-समोसे गायब होण्याची शक्यता; प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:51 IST2026-03-12T06:50:56+5:302026-03-12T06:51:21+5:30
आयआरसीटीसीने पाठवलेल्या पत्रात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

रेल्वे स्थानकांतून वडे-समोसे गायब होण्याची शक्यता; प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांची सूचना
मुंबई : रेल्वे स्थानकांवरील वडे, समोसे, ब्रेड पकोडा यांसारखे तळलेले खाद्यपदार्थ काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे पुरवठादारांनी रेल्वे खाद्य स्टॉलधारकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून दोन महत्त्वाची पत्र जारी करण्यात आली.
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) मुंबईतील स्थानकांवर असलेल्या सर्व खानपान परवानाधारकांना पत्र पाठवून संभाव्य गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पर्यायी उपाययोजना करण्याच्या
सूचना दिल्या. त्यामुळे परवानाधारकांनी चिंता व्यक्त केली आहे.
आयआरसीटीसीने पाठवलेल्या पत्रात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि जनआहार केंद्रांमधील सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी एलपीजीऐवजी मायक्रोवेव्ह किंवा इंडक्शनसारख्या पर्यायी स्वयंपाक पद्धतींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
‘रेडी-टू-इट’ पदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश
मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर ४६०हून अधिक खाद्य स्टॉल आहेत. यापैकी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट - डहाणू मार्गावरच २६४ स्टॉल आहेत. या स्टॉलवर विकले जाणारे पदार्थ प्रामुख्याने बाहेरील केटरर्सकडून मोठ्या प्रमाणात तयार करून आणले जातात आणि दररोज रेल्वे स्थानकांवरील स्टॉलवर पुरवले जातात. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, युद्धामुळे उर्जा पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा सल्ला देण्यात आला आहे. एलपीजीवर स्वयंपाक करणे शक्य नसल्यास अधिकाऱ्यांना तत्काळ कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच पॅकेज्ड आणि रेडी-टू-इट पदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वे बोर्डाची मागणी काय?
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र पाठवून रेल्वेच्या सेवांसाठी एलपीजी पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. सुमारे ३४० रेल्वे स्थानकांवर आवश्यक असलेल्या सिलिंडरचा पुरवठा कायम ठेवण्याची विनंती केली. यामध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सुमारे १,००० सिलिंडरची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. पश्चिम रेल्वेवरील बांद्रा, मुंबई सेंट्रल, वलसाड आणि वसई या स्थानकांसाठी ९८ सिलिंडरची गरज असल्याचे नमूद केले.