आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:35 IST2025-09-02T10:23:06+5:302025-09-02T10:35:31+5:30
हायकोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत आहे. या आंदोलनसाठी हजारो आंदोलक मुंबई दाखल झाले आहेत. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्याने मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत मनोज जरांगेंसह आंदोलनकर्त्यांना खडसावले. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे.
गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारो मराठा आंदोलक मुंबईत आहेत. यावेळी आंदोलकांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने हायकोर्टाने फटकारले. मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या अर्टीचे प्रथमदर्शनी उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाने जरांगे व इतर आंदोलकांना परिस्थिती सुधारण्याची आणि मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याची संधी दिली. तसेच मुंबईचे जनजीवन विस्कळीत केल्याबद्दल कोर्टाने आंदोलकांना चांगलेच खडसावले. यानंतर आता मुंबई पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडण्याची नोटीस बजावली आहे. अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे. तसेच नोटीसमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्यांचीही पोलिसांनी दखल घेतली
काय म्हटलंय नोटीसमध्ये?
आंदोलकांचे सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन
आपण दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आपले आमरण उपोषण हे आंदोलन सुरू केले असून त्यामध्ये आपल्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील सुमारे ४०,००० आंदोलकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, सदर आंदोलनाशी संबंधित असलेली सुमारे ११,००० लहान मोठी चार चाकी वाहने मुंबई शहरात आणण्यात आली आहेत. त्यातील सुमारे ५००० वाहने ही दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, मा. उच्च न्यायालय परिसर, मंत्रालय परिसर, कुलाबा, काळबादेवी, डोंगरी, पायुधनी, वाडीबंदर, इ. परिसरात आणण्यात आली असून त्यातील बहुतेक वाहने हि दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, इ. मुख्य मार्गावर आणि सी.एस.एम. टि. जंक्शन, मेट्रो जंक्शन, ओ.सी.एस. जंक्शन, इ. मुख्य चौकांमध्ये अनाधिकृत रित्या उभी करण्यात आली आहेत. ही वाहने मुख्य मार्गावर व मुख्य चौकांमध्ये वाहतूकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता पार्क करण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीचा पुर्ण बोजवारा उडालेला आहे. आंदोलकांनी रस्ते व चौकांमध्ये उघड्यावर अन्न शिजवून, अर्धनग्न अवस्थेत स्नान करून, उघड्यावर शौचास बसून व लघुशंका करून, सार्वजनिक स्वास्थास बाधा निर्माण केली आहे. तसेच, त्यांनी सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन देखील केलेले आहे.
५ हजार पेक्षा जास्त आंदोलक आणून नियमाचा भंग
२९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता आंदोलन स्थगित करणे अपेक्षित होते. पण तसे न करता १ सप्टेंबरपर्यंत ते सुरु ठेवले आहे. आंदोलन सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा अर्ज नियमावलीतील विहित नमुन्यात नव्हता. ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी करुन नियमांचा भंग केला. मुख्य मार्गावर व चौकात वाहने पार्क करुन वाहतूक कोंडी केली. ५ हजार पेक्षा जास्त आंदोलक आणून नियमाचा भंग केला. आपल्याच आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्याने परवानगी देता आली नाही. त्यामुळे इतर आंदोलनाला परवानगी देता आली नाही. त्यामुळे आंदोलनाचा हक्क बाधित झाला आहे.
कबड्डी खेळून सार्वजनिक वाहतूकीस अडथळे
आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सी.एस.एम.टि., चर्चगेट रेल्वे स्थानके, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, ओ.मी. एस. जंक्शन, सी.एस.एम.टि. जंक्शन या ठिकाणी मोर्चे नेवून रास्ता रोको केले, अश्लिल वर्तन केले, सत्यावर क्रिकेट / कबड्डी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतूकीस अडथळे आणले. तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांचे टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले व रस्त्यावरील सिग्नल पोल वर चढून नारेबाजी केली. तसेच, सिटी बममध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरीकांशी उद्धट वर्तन करून भांडणे केली. आंदोलकांनी आपल्या आंदोलना दरम्यान नियमबाह्य कामे करून नियमाचा भंग केला. स्वतः आंदोलनासाठी वापरत असलेल्या ध्वनीक्षेपकाची रितसर परवानगी घेतलेली नाही.
मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा शिल्लक ठेवणार नाही
प्रसार माध्यमांसमोर बोलताना, "त्यांच्या अडमुठेपणामुळे नुसते मुंबईचे बेट जर तुमच्यावर संभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावे लागणार. तुम्हाला फक्त मुंबईच बेट संभाळावे लागणार आहे, आजुबाजुचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहे. हे तुम्ही, मी करून आजपर्यंत दाखवलेले आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुध्दा नाही तुमचं मग. महाराष्ट्र तर नाही पण बेट सुध्दा तुमचा नाही" असे विघटनवादी वक्तव्य केले आहे. तसेच, आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, आपण महाराष्ट्रातील ५ करोड पेक्षा अधिक मराठ्यांना मुंबई शहरात आणून मुंबईमध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक ठेवणार नाही, अशा आशयाची धमकी दिलेली आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं.