मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:02 IST2026-04-06T10:01:08+5:302026-04-06T10:02:09+5:30
केंद्रीय तक्रारींची नोंदणी कमी दाखवण्यात विभागीय रेल्वेला मदत होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल/ एक्स्प्रेस ट्रेनमधील तक्रारींची अधिकृत नोंद कमी राहावी, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून १३९ या अधिकृत हेल्पलाइनऐवजी व्हॉट्सॲप व मोबाइल क्रमांकांचा वापर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय तक्रारींची नोंदणी कमी दाखवण्यात विभागीय रेल्वेला मदत होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
रेल्वेचा वार्षिक लेखाजोखा मांडताना पश्चिम रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्व व्यवस्थापक पंकज सिंह यांनी पश्चिम रेल्वेवर यावर्षी हेल्पलाइनवरील तक्रारींमध्ये ९ टक्के घट झाल्याचे सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, व्हॉट्सॲप किंवा मोबाइलवर केलेल्या तक्रारी केंद्रीय डेटामध्ये नोंदवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा तक्रारी ‘ऑफ द रेकॉर्ड’ राहतात. यामुळे प्रत्यक्षात किती तक्रारी आहेत, याचे खरे चित्र समोर येत नाही. परिणामी, सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेला विभागीय रेल्वेवरील दबाव कमी होऊ शकतो.
मध्य अन् पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
तज्ज्ञांच्या मते ही पद्धत दीर्घकालीन दृष्टीने घातक ठरू शकते. मात्र, प्रवाशांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्यासाठीच हा पर्याय उपलब्ध केल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले. तर रेल मदत आणि तक्रार यंत्रणेचे नियमित मॉनिटरिंग केले जाते. त्यानुसार कार्यवाहीदेखील केली जाते. या यंत्रणेला आणखी मजबूत करण्यात येत आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.