मुंबईतील अग्निशमन दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; मंत्री उदय सामंत : उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक सक्षम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:20 IST2026-03-13T10:19:57+5:302026-03-13T10:20:42+5:30

मुंबईतील उंच इमारतींमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे.

Use of modern technology in Mumbai's fire brigade; Minister Uday Samant: Security more efficient in the backdrop of tall buildings | मुंबईतील अग्निशमन दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; मंत्री उदय सामंत : उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक सक्षम 

मुंबईतील अग्निशमन दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; मंत्री उदय सामंत : उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक सक्षम 

मुंबई : मुंबईतील उंच इमारतींमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई शहारातील ३४ पेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये आग शमविण्याइतपत मुंबई अग्निशमन दलाची क्षमता नसतानाही १०० ते १२५ मजल्यांपर्यंत गगनचुंबी इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले जात असल्याबाबत विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. 

त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, मुंबई शहरामध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील उंच इमारतींमध्ये आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केपसारख्या सुविधा  समाविष्ट असतात. 

या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्यानंतरच मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून इमारतींना अंतिम परवानगी दिली जात असल्याचेही सामंत यांनी सांगितले. 

१०४ मीटरची अत्याधुनिक शिडी

मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९४ फूट उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी अधिक उंच आणि अत्याधुनिक शिडीची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेला योग्य त्या सूचना दिल्या जातील. देशातील सध्या सर्वाधिक उंच १०४ मीटरची शिडी चेन्नईमध्ये उपलब्ध असून, त्यापेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी मुंबईत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण नाही

मुंबई पालिकेच्या गोवंडी येथील पीपीपी मॉडेलवर बांधलेले पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. नव्या प्रकल्पांतर्गत येथे ५८० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असून, यामध्ये पालिकेसाठी २६४ बेड राखीव ठेवणार आहेत. याशिवाय सर्वसामान्यांना येथे महापालिकेच्या दरात उपचार दिले जातील, अशी हमी सामंत यांनी दिली.

गोवंडीत पालिकेच्या अखत्यारीतील दहा एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव खासगी भागीदारी पद्धतीने देण्यापेक्षा शासनानेच तो प्रकल्प राबवावा, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी ९३ अन्वये मांडलेल्या सूचनेद्वारे केली. 

प्रकल्प खासगी संस्थेला देण्याऐवजी शासनाने स्वतः रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारले तर सर्वसामान्य नागरिकांना अधिक लाभ होईल. त्यामुळे या संपूर्ण प्रस्तावाचा पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती अहिर यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, हे प्रकल्पाची जागा खासगी संस्थेला देऊन खासगीकरण, व्यापारीकरण करून दुसऱ्याच्या घशात जागा घालण्याचा सरकारचा उद्देश नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

 

Web Title: Use of modern technology in Mumbai's fire brigade; Minister Uday Samant: Security more efficient in the backdrop of tall buildings