Join us

पालिकेच्या शौचालयावर बेकायदा बॅनर लावण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचा वापर

By धीरज परब | Updated: October 24, 2022 19:34 IST

ठोस कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- मीरा भाईंदर शहरात बेकायदा बॅनरबाजीला ऊत आला असून महापालिका ठोस कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने राजकारण्यांची बेकायदा बॅनर लावण्याची हिंमत वाढत चालली आहे. मीरारोडच्या पेणकरपाडा येथील पालिका सार्वजनिक शौचालयावर बेकायदा बॅनर लावण्यासाठी चक्क पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराचा वापर केला गेल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पेणकरपाडा येथील सार्वजनिक शौचालयावर स्थानिक माजी नगरसेविका अनिता पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने पक्षाचा शुभेच्छा देणारा मोठा बॅनर पालिकेचा कंत्राटी सफाई कामगार लावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार बेकायदा बॅनर लावता येत नाही.

बेकायदा बॅनर दिसल्यास तो काढून टाकून गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी प्रभाग अधिकारी, फेरीवाला पथक, अतिक्रमण विभागापासून बडे अधिकारी सुद्धा जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत. त्यामुळे बेकायदा बॅनर लावणारे राजकारणी मुजोर झाले असून आता तर पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच वापर बेकायदा बॅनर लावण्यासाठी केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त दिलीप ढोले व संबंधित अधिकाऱ्यांकडे गुन्हा दाखल करण्याची तक्रार करण्यात आली असली, तरी नेहमी प्रमाणेच पालिका गुन्हा दाखल करण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकमीरा रोडमीरा-भाईंदरभाजपा