Aadhaar Update: मुलांचे 'आधार' असे करा अपडेट, १५ वर्ष पूर्ण झाल्यावर अपडेट करणं आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 11:37 IST2025-04-30T11:36:32+5:302025-04-30T11:37:15+5:30
Child Aadhaar Card Update: ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. मात्र, या वयोगटातील मुलांचे वय वाढल्याने त्यांचे बोटांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे नमुने पुन्हा नोंदवणे आवश्यक असते.

Aadhaar Update: मुलांचे 'आधार' असे करा अपडेट, १५ वर्ष पूर्ण झाल्यावर अपडेट करणं आवश्यक
मुंबई : शाळा, महाविद्यालये, तसेच शासकीय कामांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभही घेता येतो. त्या अनषंगाने ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’तर्फे नवजात मुलांसाठीही आधार कार्ड जारी करण्यात येते. मात्र, ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी आधार कार्ड बनविण्यात आले असेल, तर त्यामध्ये दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतात, याकडे आता शासकीय यंत्रणांनी लक्ष वेधले आहे.
५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. मात्र, या वयोगटातील मुलांचे वय वाढल्याने त्यांचे बोटांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे नमुने पुन्हा नोंदवणे आवश्यक असते. सदर वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट केल्यास अचूक माहिती उपलब्ध होते. त्यामुळे भविष्यातील शैक्षणिक, आर्थिक सेवांचा लाभ मुलांना मिळण्यास अडचण येत नाही.
कोणतेही शुल्क नाही
मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे हे विनामूल्य आहे. पण, जर आधार कार्डमध्ये चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
बायोमेट्रिक तपशील बंधनकारक
पालक कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन मुलाचा जन्मदाखला किंवा डिस्चार्ज कार्ड / हॉस्पिटलद्वारे जारी केलेल्या स्लिपद्वारे आधार कार्ड बनवू शकतात. त्यानंतर मूल ५ वर्षांचे होते, तेव्हा आणि १५ वर्षांचे झाल्यावर बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक असते. ज्या मुलांचे आधार कार्ड ५ वर्षांपूर्वी काढले आहेत, त्यांचे बायोमेट्रिक्स, डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते.
त्यामुळे अशा मुलांच्या नावनोंदणीदरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. त्यामुळे युआयडीएआयने ५ वर्षांनंतर आधार अपडेट करणे बंधनकारक केले आहे. जेव्हा मूल पौगंडावस्थेत प्रवेश करते, तेव्हा त्याच्या बायोमेट्रिकमध्ये बदल होतात. त्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे.
कुठे कराल संपर्क?
जवळच्या आधार केंद्रात जाऊन कार्ड अपडेट करता येते, तसेच पोस्ट ऑफिस, शासकीय आधार केंद्रात कार्ड अपडेट करता येते.