मुंबई : गावी जाण्यासाठी मुलाकडून पैसे घेऊन निघालेले ७६ वर्षीय वडील घरी परतले नाहीत म्हणून मुलांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील जखमी अवस्थेत सापडले. चौकशीत ओळखीच्या तरुणाने त्यांच्याकडील पैशांसाठी क्रूरपणे मारहाण करीत अनैसर्गिक अत्याचार केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे त्यांना समजले.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जोगेश्वरी पोलिसांनी टाळाटाळ करीत जखमी अवस्थेत वडिलांना चार तास पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. अखेर, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले ?जोगेश्वरीत राहणारे पीडित ज्येष्ठ नागरिक लहान मुलासोबत राहायचे. जोगेश्वरीत राहणाऱ्या मोठ्या मुलाकडून पैसे घेऊन गोरेगावच्या घराच्या दिशेने निघाले. दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत घरी आणल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. मृत्यूपूर्वी पीडिताच्या जबाबानुसार, शुक्रवारी रात्री ते मुलाकडून पैसे घेऊन घरी निघाले. वाटेत फान्सीसवाडीत राहणारा सचिन महागावकर त्यांना भेटला.
दोघांनी गप्पागोष्टी करत दारूचे सेवन केले. चालता येत नसल्याचे पाहून सचिनने घरी येण्याचा आग्रह केला. घरी पोहोचताच सचिनने पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच मारहाण केली. तसेच अनैसर्गिक अत्याचारानंतर घराबाहेर सोडल्याचे म्हटले. या जबाबावरून पोलिसांनी सचिनला अटक केली.
तक्रारदाराच्या जबाबानुसार गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.रमेश भावे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
कारवाईची मागणीशिफ्ट चेंजिंगच्या गडबडीत असल्याने महिला अधिकाऱ्याने जबाब नोंदवण्यास नकार दिला. वडिलांना पोलिस ठाण्यात आणल्यावर जबाब नोंदवला. मात्र अत्याचाराची कलमे लावली नाहीत. याप्रकरणी आरोपीसह दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी पीडिताच्या मुलाने केली.
डॉक्टरही उपलब्ध नव्हतेशनिवारी वडिलांना ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र, तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले, पण डॉक्टर उपलब्ध नसल्याने सोमवारी येण्यास सांगितल्याचे मुलाचे म्हणणे आहे.