मुंबईच्या कुलाब्यातील नेव्ही नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने अग्नीवीर जवानाला फसवून त्याच्याजवळील 'इंसास रायफल', तीन मॅगझीन आणि ४० जिवंत राऊंड चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नेव्ही नगर येथील ‘रडार प्रोटेक्टर’ या ठिकाणी २० अग्निवीर जवान ड्युटीवर होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने एका जवानाशी संपर्क साधला. स्वतःची ओळख क्विक रिस्पॉन्स टीमचा सदस्य म्हणून सांगत त्याने जवानाकडून 'इंसास रायफल', तीन मॅगझीन आणि ४० जिवंत राऊंड घेतल्या व जवानाला हॉस्टेलमध्ये जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले. रात्री १ वाजता जवान आपले विसरलेले घड्याळ घेण्यासाठी ड्युटीच्या ठिकाणी परत आला, तेव्हा त्याला तो व्यक्ती दिसला नाही. संशय बळावल्यावर त्याने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेचच परिसरात शोध मोहीम सुरू केली. ७ सप्टेंबर रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरी व फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नौदलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.