Join us  

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 6:04 PM

लवकरच परीक्षादरम्यानच्या घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेची माहिती जाहीर करावी; परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर विद्यार्थी पालक चिंतेत

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या उन्हाळी २०२० परीक्षेचे अंतिम वेळापत्रक गुरूवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या २९ऑगस्ट, द्वितीय, तृतीय वर्षाच्या १७ ऑगस्ट तर अंतिम वर्षाच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून सुरू होत आहेत. मात्र महाराष्ट्र आरोग्य व विज्ञान विद्यापीठाने या विविध शाखेच्या वैद्यकीय परीक्षाबाबतीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितते संबंधी उदासीनता बाळगली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितते  संबंधी घेण्यात येणाऱ्या उपाययोजना तात्काळ जाहीर कर्णयची मागणी विद्यार्थी पालक करत आहेत.आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षे दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोविडचा प्रादुर्भाव झाला तर त्याच्यावर कश्या प्रकारे उपचार होतील व त्याचा खर्च कोण उचलणार? त्याला पुढच्या पेपरसाठी संधी कधी व कशी मिळणार? जर दुर्दैवाने जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी विद्यापीठ घेणार कि वैद्यकीय शिक्षण मंत्री ? असे प्रश्न विद्यार्थी व विशेषतः पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. अनेक विद्यार्थी तर लॉकडाउनमुळे आपल्या मूळ गावी परतल्याने त्यांना जवळच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची सोय नाही. मूळ ठिकाणाहून कोरोना प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात पालक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठवायला घाबरत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने(मासू) चे संस्थापक अध्यक्ष सिद्ध्यर्थ इंगळे यांनी उपस्थित केला आहे. मासु द्वारे करण्यात आलेल्या गुगल सर्व्हेक्षणच्या आधारे विद्यार्थ्यांचे नजीकचे परीक्षा केंद्राचे  कमीत कमी अंतर हे ३० किलोमीटर आहे मग विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहचणार कसे?  लॉकडाऊन हे ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आलेले आहे आणि १२ ऑगस्ट पर्यंत ट्रेन सुद्धा बंद असणार आहेत अशा समस्या त्यांनी मांडल्या आहेत.सध्यस्थितीत काही विद्यार्थ्यांकडे स्टडी मटेरियल नाही. अभ्यासक्रम अपूर्ण आहे मग विद्यार्थी परीक्षा कश्या पास करू शकतात ? बीडीएसची परीक्षा ही प्रॅक्टिकल बेस असते मग त्यासाठी विद्यार्थी दंत रुग्ण कोठून आणणार? असे प्रश्न ही संघटनेच्या माध्यमातून मांडले आहेत. बैठक व्यवस्थापनाचे नियोजन , सॅनिटायझर , मास्कची उपलब्धी याबाबत तरी विद्यापीठाकडून सूचना अपेक्षित आहेत मात्र त्याबद्दल ही काहीच निर्देश नसणे म्हणजे विद्यार्थ्यंच्या आयुष्याशी खेळ चालविल्याची प्रतिक्रिया सिद्ध्यर्थ इंगळे यांनी व्यक्त केली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तत्काळ याची दखल घेऊन आवश्यक ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी अन्यथा विद्यार्थी पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशिक्षणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक