- अतुल कुलकर्णी मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला किती रुपयांची मदत केली याची आकडेवारी सांगत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आणि विखुरलेले महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात पहिल्यांदा एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा एकीचे दर्शन घडविले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघात इस्लामपूरला होते. मात्र त्यांना पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईत बोलावून घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महूसल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब मुंबईत होते. शरद पवार राज्यपालांना भेटून आल्यानंतरच तिन्ही पक्षांनी एकत्रपणे जनतेसमोर गेले पाहिजे अशी चर्चा झालीच होती.
शिवाय प्रशासनाने देखील माध्यमांना माहिती दिली पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच मुख्य सचिव अजोय मेहता व अन्य अधिकाऱ्यांनी एकत्रपणे मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी समन्वय समितीची बैठक घ्यायची असेही ठरले होते. त्यानुसार बुधवारी समन्वय समितीची बैठक झाली.
फडणवीस यांनी केलेली टीका आणि दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही, असे चित्र तयार झाल होते. त्यामुळे पत्रकार परिषद घेत ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिल्याचे सांगितले जाते.