लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. रविवारी रात्री त्यांचे नागपूर येथे आगमन होणार आहे. सोमवारी ते नागपूर तथा नांदेड येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तर मंगळवारी त्यांचे मुंबईत कार्यक्रम आहेत. मंगळवारी त्यांचे मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत.
शाह हे रविवारी रात्री साडेनऊला नागपूर येथे दाखल होतील. सोमवारी सकाळी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १ वाजता चिंचोली येथील एनएफएसयूच्या स्थायी परिषद कार्यालयाच्या भूमिपूजनाला ते उपस्थित राहतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता ते नांदेडला पोहोचणार आहेत. दुपारी नांदेड येथील आनंदनगरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे ते अनावरण करतील. दुपारीच ते कुसुम ऑडिटोरियम येथे बैठक घेणार आहेत. संध्याकाळी नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहे.
सोमवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन होईल. मंगळवारी सर कावसजी जहांगीर सभागृह येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. माधवबाग संकुलातील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २७ मे रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.