Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दुर्दैवाने जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:01 IST

मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती रविवारी आणखी खालावली आहे.

मुंबई - मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषणाला सुरूवात केली असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. रविवारी त्यांची प्रकृती खालावली होती, तरीही जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, जरांगे यांच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्रातील अनेक मराठा बांधव तांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती रविवारी आणखी खालावली आहे. परंतु, जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. ‘मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा,’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी सरकारला केला. दरम्यान, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला असून, अनेक नेत्यांना आंदोलकांच्या रोषाला सामेरे जावे लागत आहे.

दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलीय. ''समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय?. सरकारला थोडी जरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या. दुर्दैवाने त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती, असा विनंतीपूर्वक इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.  

अजित पवारांना डेंग्यू, जरांगे पाटील यांच्या मुलीचा सवाल?

मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांच्या मुलीने अजित पवार यांच्यावर टीका केली. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, माझ कुटुंब माझ्या समोर आणू नये असं आमच्या पप्पांनी सांगितलं आहे. आता याला सरकारच जबाबदार आहे.  आता आणखी कोण उपोषण करत आहेत त्यांनी पाणी तरी घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांची अवस्था पाहून आईची परिस्थिती वाईट झाली आहे. अजित पवार अंतरवलीत येणार होते पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात, असं सडेतोड उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने दिले आहे. 

टॅग्स :रोहित पवारमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलजालना