बेराेजगार तरुण ठरताहेत सायबर चाेरट्यांचे ‘टार्गेट’;बॅंक खाती हाेताहेत रिकामी : ८ महिन्यांत २२७ गुन्ह्यांची झाली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:38 IST2025-10-04T13:37:45+5:302025-10-04T13:38:15+5:30
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना सायबर चाेरट्यांकडून टार्गेट करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

बेराेजगार तरुण ठरताहेत सायबर चाेरट्यांचे ‘टार्गेट’;बॅंक खाती हाेताहेत रिकामी : ८ महिन्यांत २२७ गुन्ह्यांची झाली नोंद
मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना सायबर चाेरट्यांकडून टार्गेट करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या आठ महिन्यांत फसवणुकीसंबंधी २२७ गुन्हे नोंद झाले आहेत. मात्र, त्यापैकी अवघ्या ४२ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
बनावट संकेतस्थळावरून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून तरुणांच्या हाती बनावट ऑफर लेटर देत फसवणूक होत असल्याच्या घटनाही समोर आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपींपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ऑनलाइन नोकरी, यू ट्यूब लिंक लाइक करून पैसे कमविणे, विविध वेबसाइटवर ऑनलाइन वस्तू विकून कमिशन मिळविणे, अशा प्रकारचे प्रलोभन सायबर भामट्यांकडून दाखविण्यात येते. त्याला बळी पडू नये, असे आवाहन चुनाभट्टी पोलिसांकडून बेराेजगार तरुण, नागरिकांना करण्यात येत आहे.
वर्क फ्रॉम होमच्या नादात खाते रिकामे
शॉपिंग वेबसाइटवरील विविध उत्पादने खरेदी करून ती कंपनीतील मर्चंट रिटेलर यांना विकून त्याबदल्यात चांगले कमिशन देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केली जात आहे. जास्तीच्या कमिशनसाठी लॅपटॉप, महागडे घड्याळ, गोल्ड कॉइन, सन ग्लासेस, स्टेज लाइट, कार्पेट, कॅमेरा अशा महागड्या उत्पादनांची खरेदी - विक्री करण्यास भाग पाडले जाते. यात तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ऑफर लेटरही देण्यात येतात. त्यामुळे अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत.
...अशी घ्या काळजी
> सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असताना आपली गोपनीय सेटिंगचा वापर करा.
> कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
> ऑनलाइन बँक व्यवहार करताना काळजी घ्या.
> आपला पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका.
७३० जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक
मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठ महिन्यांत सायबर संबंधित २ हजार ९४८ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ८७७ गुन्ह्यांची उकल झाली असून, ७३० जणांना अटक केली. यामध्ये नोकरीशी संबंधित २२७ गुन्ह्यांचा समावेश आहे.