मुंबईत उद्योजिकेला बंदुकीचा धाक दाखवून कपडे काढायला लावले; फार्मा कंपनीच्या MD वर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:30 IST2025-12-01T18:26:39+5:302025-12-01T18:30:35+5:30
मीटिंगच्या बहाण्याने बोलावून ५१ वर्षीय उद्योजिकेचा गनपॉइंटवर विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईत उद्योजिकेला बंदुकीचा धाक दाखवून कपडे काढायला लावले; फार्मा कंपनीच्या MD वर गुन्हा दाखल
Mumbai Businesswoman Assault Case: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका ५१ वर्षीय उद्योजिकेसोबत फार्मा कंपनीच्या कार्यालयात अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. कामाच्या निमित्ताने मीटिंगसाठी बोलावून औषध कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने महिलेला बंदूक दाखवून धमकावले आणि तिचा विनयभंग केल्याचा तसेच अश्लील व्हिडीओ आणि फोटो तयार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी फ्रँको-इंडियन फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मीटिंगच्या बहाण्याने बोलावले
तक्रारदार महिला एका औषध कंपनीच्या कार्यालयात व्यवसायाच्या निमित्ताने संबंधित मीटिंगसाठी गेली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे संस्थापक सदस्य आणि व्यवस्थापकीय संचालक जॉय जॉन पास्कल पोस्ट यांनी त्यांना मीटिंगसाठी कार्यालयात बोलावले होते. कार्यालयात उपस्थित असलेल्या आरोपींनी सुरुवातीला महिलेला धमकावले आणि नंतर बंदुकीच्या धाकावर तिचे कपडे काढायला लावले. आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी या संपूर्ण घटनेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड केले.
पीडितेने विरोध केल्यास किंवा कोणाला याची माहिती दिल्यास, हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. तसेच, महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकीही देण्यात आली. पीडितेच्या तक्रारीनंतर एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. जॉय जॉन पास्कल पोस्ट (एमडी), दिनेश जैन, एलबी यादव, मनीष सिन्हा, जयेश कांग्रेसर आणि एक अन्य व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर विनयभंग, मारहाण, आणि धमकावण्यासह लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी घटनेशी संबंधित तांत्रिक पुरावे, कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर आवश्यक तथ्ये गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. आरोपींच्या भूमिकेची कसून चौकशी केली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात एका व्यावसायिक महिलेसोबत दिवसाढवळ्या कार्यालयात असा गंभीर प्रकार घडल्याने महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.