Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:36 IST2025-09-29T11:35:53+5:302025-09-29T11:36:40+5:30
Hutatma Chowk Metro Station: हुतात्मा चौक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एमएमआरसीने छत उभारलेले नाही. या भागातून पाणी पायऱ्यांवरून स्थानकात शिरण्याचा आणि त्यावरून प्रवासी घसरून पडण्याची भीती आहे.

Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
Mumbai Metro 3: आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी एमएमआरसी अर्थात मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने या भुयारी मेट्रो स्थानकांची छायाचित्रे जारी केली आहेत. त्यामध्ये हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर छत उभारण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पायऱ्या आणि सरकत्या जिन्यावरून स्थानकात शिरण्याची भीती आहे.
हुतात्मा चौक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एमएमआरसीने छत उभारलेले नाही. या भागातून पाणी पायऱ्यांवरून स्थानकात शिरण्याचा आणि त्यावरून प्रवासी घसरून पडण्याची भीती आहे. सरकत्या जिन्यावर पाणी पडून विद्युत यंत्रणा खराब होण्याचाही धोका आहे. त्यामुळे टीका होत आहे. दरम्यान, हुतात्मा चौकात हेरिटेज वास्तू आहेत. त्यासाठी मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीच्या सूचनांचे पालन करण्याच्या अनुषंगाने प्रवेशद्वाराला रुफ टॉप उभारण्यात आले नसल्याचे एमएमआरसीचे म्हणणे आहे.
पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा
मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीच्या आवश्यकतांचा विचार करून प्रवेशद्वार छताविना तयार केले आहे. यातून आत शिरणारे पाणी बाहेर काढण्यासाठी व्यवस्था आहे. प्रवेशद्वार पायऱ्यांनंतर लगेच कोरडी जागा सुरू होते, अशी प्रतिक्रिया एमएमआरसीच्या नियोजन विभागाचे संचालक आर. रमण्णा यांनी समाजमाध्यमांतून दिली आहे.
शॉर्टसर्किट होऊन अपघाताचा धोका
पावसाचे पाणी पायऱ्यांवरून स्थानकात शिरणार आहे. सरकत्या जिन्यासाठी विद्युत यंत्रणा वापरलेली असते. यात पाण्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अपघात होऊ शकतो. या भागात काचेचा अथवा हेरिटेज वास्तूला साजेसा असा रुफटॉप उभारता आला असता. मात्र तसा विचार झाला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन रूफटॉप उभारणे आवश्यक आहे, अशी मागणी वाहतूकतज्ज्ञ ए. व्ही. शेणॉय यांनी केली.