‘भुयारी मेट्रो’ने बेस्टला डावलले; फीडर बससेवेसाठी खासगी भागीदाराची नियुक्ती; करारावर विविध क्षेत्रांतून जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:34 IST2025-10-16T09:34:43+5:302025-10-16T09:34:55+5:30
बीकेसी, वरळी आणि फोर्ट परिसरातील कार्यालयात रोज लाखो कर्मचारी येतात. मेट्रो स्थानकापासून कार्यालयात पोहचण्यासाठी फिडर बससेवेची आवश्यकता होती. त्यानुसार ही बससेवा सुरू केली आहे.

‘भुयारी मेट्रो’ने बेस्टला डावलले; फीडर बससेवेसाठी खासगी भागीदाराची नियुक्ती; करारावर विविध क्षेत्रांतून जोरदार टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या बीकेसी, वरळी आणि सीएसएमटी मेट्रो स्थानकावर फीडर बस सेवा म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने खासगी कंपनीशी केलेला करार वादात सापडला आहे. आधीच प्रवासी संख्या घटत असल्याने आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या बेस्टच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सीटी फ्लो कंपनीकडून कमीत कमी प्रवासी भाडे २९ रुपये आकारले जाणार आहे. ते बेस्ट बसच्या किमान भाड्याच्या तुलनेत तब्बल अडीच पट अधिक आहे.
बीकेसी, वरळी आणि फोर्ट परिसरातील कार्यालयात रोज लाखो कर्मचारी येतात. मेट्रो स्थानकापासून कार्यालयात पोहचण्यासाठी फिडर बससेवेची आवश्यकता होती. त्यानुसार ही बससेवा सुरू केली आहे.
प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी फीडर सेवा महत्त्वाची आहे. सिटीफ्लोच्या माध्यमातून ती दिली आहे,’ असे एमएमआरसीच्या नियोजन विभागाचे संचालक आर. रमणा यांनी सांगितले.
मुंबई मेट्रोने बेस्टऐवजी खासगी बस सेवेशी भागीदारी करण्याचा घेतलेला निर्णय अविचारी असल्याचे उद्धवसेनेचे नेत वरुण देसाई यांनी म्हटले आहे. तर, सरकारने बेस्टच्या बस वाढविण्याची गरच आहे. बेस्टला बस न देता गळचेपी करून खासगी ही सेवा दिली जात असल्यास ते चुकीचे आहे, असे मत तज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांनी व्यक्त केले.
कसा असेल मार्ग?
बीकेसी स्थानक - बीकेसीत हा मार्ग एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय आदी ठिकाणांवरून जाईल.
वरळी - सेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क भागातून जाईल.
सीएसएमटी - हा मार्ग जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस. पी. मुखर्जी चौक, के. सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानकाशी जोडला जाईल.
करारासाठी निकष कोणते?
उबर, सिटी फ्लोच्या १२५ बसवर आटीओने कारवाई केली होती. परवानग्या न घेता सुरू असलेल्या ॲपवर आधारित बस, कार, बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानुसार कारवाई केली होती. मेट्रोने सिटी फ्लोसोबत करार केला आहे. एकीकडे अनधिकृत म्हणत कारवाई केल्यानंतरहा करार झाल्याने कोणते निकष लावले, असा प्रश्न आहे.