Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे विचाराधीन; निर्जंतुकीकरण, सुरक्षिततेच्या पर्यायांची घेणार काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 06:34 IST

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार आहे.

मुंबई : राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार आहे. सर्वात आधी रेड झोनमध्ये नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील. स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सुरक्षितता यांसारख्या पर्यायांची काळजी घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

शाळा सुरू करण्याबाबत शनिवारी सर्व विभागीय उपसंचालक, नगर, पालिकांचे शिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील महत्त्वाचे अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. राज्यांतील हजारो शाळा या क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात आहेत, तर अनेक शिक्षकांची नियुक्ती ही या शाळांवर केली आहे. अशा परिस्थितीत शाळा नेहमीप्रमाणे १५ जून रोजी सुरू करता येतील का आणि केल्या तर त्यासाठी कोणते पर्याय अंमलात आणता येतील, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार आहे. मोठ्या शहरातील शाळांना ई- लर्निंगचा पर्याय आहे, मात्र आदिवासी किंवा अत्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सुद्धा शिक्षण विभगाचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी निर्जंतुकीकरण, आवश्यक सुरक्षित अंतर या सर्वांकडे लक्ष देण्यात येईल.

रेड झोनमधील परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत ई-लर्निंग, आॅनलाइन क्लासेस चुकू नयेत यासाठी शिक्षक, शाळांना तसे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशाळा