महापालिका, राजकारण्यांच्या आशीर्वादाने मीरारोडमध्ये अनधिकृत बांधकामे, सामान्यांची फसवणूक

By धीरज परब | Updated: February 19, 2025 23:25 IST2025-02-19T23:22:58+5:302025-02-19T23:25:31+5:30

चाळीत रूम देण्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल

Unauthorized constructions in Mira Road with the help of the municipal corporation and politicians cheating with common people | महापालिका, राजकारण्यांच्या आशीर्वादाने मीरारोडमध्ये अनधिकृत बांधकामे, सामान्यांची फसवणूक

महापालिका, राजकारण्यांच्या आशीर्वादाने मीरारोडमध्ये अनधिकृत बांधकामे, सामान्यांची फसवणूक

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिका आणि तत्कालीन स्थानिक नगरसेवक , राजकारणी व आमदारांच्या आशीर्वादाने मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी उभी राहिली असून अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे . अश्याच अनधिकृत खोल्या बांधकाम प्रकरणात फसवणुकीचे दोन गुन्हे काशिगाव पोलीस ठाण्यात झाले आहेत. अनधिकृत बांधकामे रोखण्याचे अनेक न्यायालय व शासन आदेश असले तरी अनधिकृत बांधकामात बक्कळ काळी कमाई असल्याने अनेक महापालिका अधिकारी , नगरसेवक हे अनधिकृत बांधकाम प्रकरणात लाच घेताना पकडले गेले आहेत . शहरात राजरोस अनधिकृत बांधकामे उभी रहात असताना  महापालिका, स्थानिक नगरसेवक , राजकारणी , आमदार , पत्रकारच्या आड खंडणी उकळणारे बोरूबहाद्दर  आदींचे अर्थपूर्ण संगनमत म्हणा वा आशीर्वाद चर्चेचा विषय आहे.

अनधिकृत बांधकाम बांधून ती विकून मोकळे व्हायचे वा त्यात वास्तव्य करायचे. त्यावर ठोस कारवाई करून गुन्हे दाखल करणे तर सोडाच उलट त्याला वीज, नळ जोडणी आणि टॅक्स सहज लावून दिले जातात. नोटांचा व्यवहार उरकला कि मग वोटचा व्यवहार सुरु होतो आणि त्या बांधकामांना संरक्षणासह त्या भागात पालिका खर्चातून सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी असलेल्या मीरा भाईंदरच्या मांडवीपाडा भागात लाल बहादूर यादव याने  जागेसह खोलीचे बांधकाम करून देतो म्हणून  बन बिहारी उपेंद्र करन ह्या मजुरा कडून ६ लाख ३८ हजार रुपये उकळले. त्याच जागेवर खोली बांधून देतो म्हणून यादव ह्याने बिंदू दीपक यादव ह्या महिले कडून देखील ४ लाख रुपये उकळले . फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर करन यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा लाल बहादूर यादववर दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत बेस्ट मधून निवृत्त झालेल्या सुरेश यादव यांनी पांडुरंग किसन काम्बड़ी यांच्या कडून घोडबंदर सर्वे क्र . १६२ मधील ४५० चौ . फु . जागा ६६ हजार ५०० रुपयांना २००२ साली पत्नी सुनीताच्या नावे लीज वर घेतली होती .  यादव सह त्यांचे परिचित विठ्ठल होलमुखे , आनंद जाधव व गुरुचरणदास कांबळे यांनी पत्नींच्या नावे जागा लीजवर घेतल्या. त्यातील सुनीता यादव व वंदना कांबळे यांच्या ९०० चौ फूट जागेत ३ खोल्या बांधून त्यातील दोन खोल्या यादव व कांबळे यांना देण्याचे व १ खोली समीर सुर्वे आणि दिनेश मिश्रा हे बांधकाम करणारे घेणार असे ठरले . तसा करार केला . सुर्वे याने तर होणाऱ्या खोलीस वीज , नळ जोडणी आणि पालिकेचा कर आकारणी साठी यादव यांच्या कडून १२ हजार रुपये घेतले. परंतु सुर्वे आणि मिश्रा यांनी तीन खोल्या बांधून त्यातील दोन खोल्या ह्या यादव व कांबळे यांना न देता परस्पर दुसऱ्यांना विकून टाकल्या . सुर्वे व मिश्रा यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे . या दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत . ह्या आधी देखील अनधिकृत बांधकाम व विक्री प्रकरणी अनेकांची फसवणूक झाली असून अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Web Title: Unauthorized constructions in Mira Road with the help of the municipal corporation and politicians cheating with common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.