बसची फी परवडेना, जूनपासून स्कूल बस भाडे १८ टक्क्यांनी वाढणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:50 IST2025-02-17T10:50:22+5:302025-02-17T10:50:48+5:30

नवीन शैक्षणिक वर्षात स्कूल बस फी वाढीचा जोरदार झटका पालकांना बसण्याचे संकेत आहेत. अर्थात, विद्यार्थी सुरक्षा नियमावलीच्या अनुषंगाने बसमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सुविधा, तसेच बसची देखभाल, दुरुस्ती आणि इंधन व मनुष्यबळाच्या वाढत्या खर्चामुळे ही भाडेवाढ अटळ असल्याचे स्कूल बस संघटनांचे मत आहे. मात्र, त्यांनी प्रस्तावित केलेली भाडेवाढ तब्बल १८ टक्क्यांच्या घरात आहे. त्यातदेखील ही अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केल्यानंतर खरंच ‘विद्यार्थी सुरक्षे’चे ध्येय साध्य होणार का? हा प्रश्नही पालकांना सतावतो आहे.

Unable to afford bus fares, school bus fares to increase by 18 percent from June? | बसची फी परवडेना, जूनपासून स्कूल बस भाडे १८ टक्क्यांनी वाढणार ?

बसची फी परवडेना, जूनपासून स्कूल बस भाडे १८ टक्क्यांनी वाढणार ?

मुंबई : राज्यातील स्कूल बस युनियनने नवीन शैक्षणिक वर्षात बस भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रत्येक शाळेकडे पाठवला आहे. त्यामुळे यंदा ‘स्कूल बस फी’  महागण्याचे संकेत असून मार्च महिन्यात यावर अंतिम निर्णय होणार आहे.

प्रत्येक शाळेच्या नियमानुसार आणि शाळा प्रशासन व पालकांच्या अपेक्षांनुसार दरवर्षी स्कूल बसचे दर ठरवले जातात. मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखालील पालक, शिक्षक समितीचे प्रमुख, आरटीओ अधिकारी, बस ऑपरेटर यांचा समावेश असलेली स्कूल बस कमिटी दरवर्षी मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेते. त्यासाठी शाळेच्या बस सेवा संबंधित नियम, विद्यार्थ्यांची वाहतूक करताना बसचे प्रकार, बसण्याची क्षमता, तसेच बस मार्गावर ठरलेल्या अंतराचा विचार केला जातो. यामुळे प्रत्येक शाळेचे बस भाडे वेगवेगळे असते.

साधारणतः मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या दरांमध्ये थोडेफार साम्य असते, तर आंतरराष्ट्रीय शाळांच्या दर थोडे अधिक असते. कारण त्यांच्या सेवेबाबतच्या मागण्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. सध्या साधारणपणे ८०० ते तीन हजार रुपये  प्रती महिना स्कूल बस फी आकारली जाते.

स्कूल बस कमिटीने बस भाडेवाढीचा प्रस्ताव मान्य केल्यास ही फी ९४५ ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. साहजिकच या फीवाढीमुळे पालकांच्या खिशाला पुढील शैक्षणिक वर्षांत चटके बसणार असल्याने चिंता व्यक्त केली जात असून, या  फी वाढीला पालकांकडून विरोधहोत आहे.

मुंबई : मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वर्षभरात ७०० पेक्षा अधिक स्कूल बसची तपासणी केली असून, दोषी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत ११ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई सेंट्रल आरटीओच्या हद्दीत ८४० नोंदणीकृत स्कूल बस आहेत. त्याचबरोबर इतर वाहनांतूनही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. या सर्व वाहनांची आरटीओकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यात दोषी आढळणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर कारवाई करण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ७३९ गाड्यांची तपासणी केली आहे. त्यापैकी सुमारे २०० पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करताना त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

बसचे काही नियम

स्कूल बसच्या परवान्यासाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क. प्रति सीट वार्षिक १०० रुपये शुल्क आरटीओकडे भरावे लागतात. 

वाहनाचा रंग पिवळा असावा.

वाहनाच्या पुढे आणि मागे ‘स्कूल बस’ लिहिलेले असावे.

वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूंनी विटकरी रंगाच्या पट्ट्यावर शाळेचे नाव लिहिलेले असावे.

Web Title: Unable to afford bus fares, school bus fares to increase by 18 percent from June?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा