भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 19:53 IST2025-07-13T19:52:00+5:302025-07-13T19:53:07+5:30
Ujjwal Nikam Net worth property: लोकसभेला पराभूत झालेले उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली

भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
Ujjwal Nikam Net worth property : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर आज (१३ जुलै) प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उज्ज्वल निकम यांना भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी मिळाली होती. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासारखे भाजपाचे बडे नेते त्यांच्या प्रचारात सहभागी होते. पण लोकसभेत त्यांच्या पदरी पराभव आला. त्यानंतर सुमारे वर्षभराने आज त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाली. गेली अनेक वर्षे प्रतिष्ठित सरकारी वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती, याबद्दल जाणून घेऊया.
उज्ज्वल निकम यांची मालमत्ता किती?
उज्ज्वल निकम यांच्या नावे एकूण २७ कोटी ७० लाख ७१ हजार ९८३ रुपयांची संपत्ती असल्याचे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. त्यावेळच्या प्रतिज्ञापत्रानुसार, निकम यांच्याकडे ११ लाख रुपये रोख रक्कम, ५ लाखाची ह्युंडाई कार, १४ लाखांचे सोने, २ लाखांची चांदी अशी एकूण १७ लाखांची जंगम मालमत्ता आहे.
मुंबईत दोन स्वत:चे फ्लॅट्स
निकम यांच्या नावे पाथर्डीमध्ये (नाशिक) ०.४९ एकर, मंगरुळमध्ये १.४४ एकर शेतजमीन आहे. जमिनीच्या बाजारभावानुसार त्याची किंमत अनुक्रमे ९३ लाख आणि ५ लाख ६४ हजार आहे. नाशिकमध्ये तीन ठिकाणी साडेपाच कोटी रुपये मूल्याची अकृषी जमीन आहे. अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे १० कोटींची घरे आहेत. तर पत्नीच्या नावे माहीममध्ये ८ कोटींची एकूण मालमत्ता आहे.
जंगम मालमत्ता
- रोख रक्कम- ११,३५,७९५
- वाहन- ५,२७,४३३ रुपयांची ह्युंडाई कार
- सोने- १४,७१,६४० रुपये मूल्य
- चांदी- २,५९,५०० रुपये मूल्य
- एकूण जंगम मालमत्ता- १७,४५,९५,००५ रुपये
स्थावर मालमत्ता
- पाथर्डी (नाशिक)- ०.४९ एकर शेतजमीन (९३ लाख)
- मंगरुळ- १.४४ एकर शेतजमीन (५ लाख ६४ हजार)
- नाशिक- तीन ठिकाणी साडे पाच कोटी रुपये मूल्याची अकृषी जमीन
- अंधेरी, जळगाव, दहिसर घरे- १०,२४,७६,९७८ एकूण मूल्य
- पत्नीच्या नावे माहीममध्ये मालमत्ता- ८,४६,११,९१० एकूण मूल्य