Join us

पुन्हा तेच... अजित पवारांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:05 IST

अधिवेशन सुरू असल्याने सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही चांगलेच सक्रीय झाले असून विधिमंडळातही येत आहेत.

मुंबई - राज्यासह देशातील विरोधी पक्षातील साऱ्यांची मोट बांधण्याचे काम सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करताना दिसत आहेत. याच धर्तीवर बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच कार्यकर्त्यांना पुढील बाबींसाठी दिशा दिली. येथील कार्यक्रमास नेतेमंडळी आपल्या वेळेनुसार येते होती. येथेही अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची एंट्री झाली. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. 

अधिवेशन सुरू असल्याने सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही चांगलेच सक्रीय झाले असून विधिमंडळातही येत आहेत. याच आठवड्यात त्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी, विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत असतानाच उद्धव ठाकरेंची एंट्री झाली. त्यामुळे, अजित पवार मागे सरकले व त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलायला दिले. मात्र, पाठिमागे जाताच त्यांनी कुणाला तरी डोळा मारला, त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता, पुन्हा एकदा अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची एंट्री झाली. मग, कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली.  

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाविकास आघाडीच्या बैठकीत हा प्रकार घडला. यावेळी, कार्यकर्त्यांनी उद्धवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली, उद्धव ठाकरेंनी थांबा म्हणून हात केल्यानंतरही  कार्यकर्ते घोषणा देतच राहिले. त्यावेळी, अजित पवारांनी जरा थांबा, असे म्हटले. आते हे सगळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवायचं आहे, जरा जोर राहू द्या, जरा थांबा, असे अजित पवार यांनी म्हटलं. मग, अजित पवार यांनी पुढील भाषणाला सुरुवात केली. 

शरद पवारांची एंट्री होताच पुन्हा घोषणाबाजी

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाषण करत होते. त्यावेळी सभागृहामध्ये एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे जेव्हा बोलायला उठले, तेव्हा NCP च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणांनंतर पुढे काय होईल असा उपस्थितांनाही काळी वेळ प्रश्न पडला. पण उद्धव ठाकरेंनी मात्र अतिशय छानपैकी उत्तर दिले आणि मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे म्हणाले- "शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यासाठी देशाची जनता तयार आहे, आम्हालाही याबद्दल काहीही हरकत नाही. पण त्या आधी मला असे वाटते की तमाम विरोधी पक्षांनी, सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे. आपण तुझं-माझं करत बसू नि इकडेच राहू. घोषणा देणारे पण इकडेच अडकून पडतील. तसं होऊ देऊ नका. पंतप्रधान पद मिळवणं हे फार मोठं स्वप्न आहे. ते एकत्र लढूनच पूर्ण करावं लागेल. कारण आता आपली एकजूट गरजेची आहे. त्यामुळे तळागातील लोकांपासून सुरूवात करा आणि पुढे जात राहा." 

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेशिवसेना