Join us
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कूटनीतीचा वापर करणार- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 18:30 IST

कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 7 एप्रिल 2017ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु आजमितीस या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

मुंबई- मुंबई महापालिकेत मागील 12 वर्षांपासून काम करणाऱ्या 2700 कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 7 एप्रिल 2017ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु आजमितीस या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्या प्रतिनिधींनी याबद्दल उद्धव ठाकरेंना भेटून नाराजी व्यक्त केली.2700पैकी 1600 कामगारांचे महापालिका अधिकारी, युनियन प्रतिनिधी आणि सरकारी कामगार अधिकारी यांच्यासमक्ष मुंबई महापालिकेमध्ये काम करत असल्याबाबत व्यक्तिशः पडताळणी झालेली आहे. उरलेल्या 1100 कामगारांची पडताळणी करून त्यांनाही कायम नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत. पण एक वर्ष होत आले तरीही पालिका प्रशासन पडताळणी पूर्ण करत नाही. यामध्ये पालिका प्रशासनाकडून कामगारांच्या पूर्वी दिलेल्या नावात व आताच्या आधारकार्ड वर असलेल्या नावात किरकोळ "इंग्रजी स्पेलिंग मिस्टक" असल्याने कामगारांना कायम करण्यात येत नाही व सध्या त्यांना कामावरून कमी केले जात असल्याचंही निदर्शनास आलं आहे.यासंदर्भात कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगानं तात्काळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या विषयाची दखल घेत आज बैठक घेतली, यावेळी ते मार्गदर्शन करताना ते म्हणाले, साम, दाम, दंड व भेद या सगळ्यांचा वापर करून या सफाई कामगारांना न्याय मिळवून देणार आहे. सफाई कामगारांचा मला अभिमान आहे.  असे काम या कामगारांना दुर्दैवाने करावे लागत आहे. हे कामगार खूप वाईट परिस्थितीतून जात असल्याचे मी स्वतः पाहिले आहे.नालेसफाईच्या कामाची पाहणी मी ज्यावेळी करायला जातो, त्यावेळी त्यांच्या वेदना मी पाहिल्या आहेत, तसेच महापौरांनी तात्काळ बैठक घेऊन यावर तोडगा काढावा, असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाने काही कागदपत्रे उद्धवजी यांच्याकडे सादर केली आहे, यावेळी अतिशय भावनिक शब्दात उद्धव ठाकरे म्हणाले की, 'या कागदपत्रांची मला आवश्यकता नाही, या सर्व सफाई कामगारांवर मला विश्वास आहे, घोटाळे  अधिकारी करतात, सफाई करणारे कामगार करू शकत नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पालिकेच्या अधिका-यांवरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिकाशिवसेनाराजकारणमुंबई