Join us
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : 'महाराष्ट्र एकवटतो तेव्हा जिंकतो, कोरोनाविरुद्ध एकवटून त्यालाही हरवूया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 20:18 IST

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्र रुग्णसेवा करीत आहात.

मुंबई - कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवूया, असे आवाहन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्र रुग्णसेवा करीत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने आक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले.

जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे

कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन करतानाच या सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्सविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणतानाच कोरोनाला हरवायचंय आणि यातील तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असेही मुख्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयांचे योगदान मोठे आहे. आताच्या परिस्थितीत मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत, त्याचप्रमाणे अतिरिक्त बेडची सुविधाही निर्माण करावी. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवितानाच प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे. खासगी रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर जपून करावा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. राज्य शासनाने चाचण्यांवर, उपचारांच्या दरांवर नियंत्रण आणले आहे त्याचे पालन होणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वाढणार नाही याची दक्षती खासगी रुग्णालयांनी घ्यावी. छोट्या शहरांसाठी ई आयसीयू उपयुक्त ठरणार असून त्याचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे, टोपे यांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या