Join us  

छाती 56 इंचाची असून उपयोग नाही, त्यात शौर्य असावं लागतं- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 1:19 PM

छाती किती इंचाची आहे हा प्रश्न नाही पण त्यात किती शौर्य आहे हे महत्वाचं आहे असा टोला मारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली आहे.

मुंबई - छाती किती इंचाची आहे हा प्रश्न नाही पण त्यात किती शौर्य आहे हे महत्वाचं आहे असा टोला मारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्यांवर भाष्य करत टीकेची तोफ डागली. यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर आक्षेप घेत नितीन गडकरींचं बोलणं ऐकून पायाची आग मस्तकात गेली असल्याचं म्हटलं. 'नौदलात असलेलं शौर्य तुमच्या 56 इंचाच्या छातीमध्ये नाही. इतकंच असेल तर सैनिकांचं फुकटचं श्रेय तुम्ही लाटू नका. दुर्दैवाने तुमचं सरकार आहे. सरकार म्हणून मस्ती दाखवता. राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा घुसला आहे', अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.

भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेत कशी टिकेल, ही चिंता माझ्या मनात कधीच नव्हती, आजही नाही असं त्यांनी सांगितलं. 1966 साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आणि त्यातील आजोबांचं भाषण आजही आठवतं.  दसरा मेळाव्याचं भाषण मासाहेबांच्या मांडीवर बसून ऐकलं होतं अशी आठवण त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड झाल्याबद्दल बोलताना घराणेशाही आणि घराण्याची परंपरा यात फरक आहे असं सांगत टीकाकारांना उत्तर दिलं. या घराची पुढची पिढी मी तुमच्या सेवेत देतोय असंही ते बोलले. 

जे ठराव घेतले आहेत ते पुर्ण विचाराने घेतले आहेत. फक्त औपचारिकता म्हणून ठराव घेण्यात आलेले नाहीत. फक्त हात वर करुन नाही तर मुठ आवळून संमती हवी आहे असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात हा कार्यक्रम सुरु असल्याने उद्दव ठाकरेंनी त्यांचा उल्लेख करत सरदार वल्लभभाई पटेल नुसते बोलणारे नव्हते. ते असते तर काश्मिर-पाकिस्तान-बांगलादेशचा प्रश्न कधीच मिटला असता असं त्यांना यावेळी सांगितलं.  

नुसतं घुसू घुसू अशी धमकी देत असतात. गोळ्या मारणार म्हणतात मग काय लिमलेटच्या गोळ्या मारणार का ? असा टोला त्यांनी यावेळी लगावला. निवडणुका आल्या की पाकिस्तानची आठवण येते, गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा काय संबंध होता असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.  मोदींना काही पडलेलं नाही, परदेशात फिरतायत अशी टीका त्यांनी यावेळी केली. परदेशी नेत्यांना अहमदाबादमध्ये नेण्यापेक्षा लाल किल्यावर घेऊन जा. जवान शहीद होत असताना तुम्ही पतंग उडवत आहात. श्रीनगरमध्ये रोड शो केला असता, तिथे पतंग उडवली असती तर आम्हालाही अभिमान वाटला असता. जगभरातील पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवा असा टोला त्यांनी लगावला. 

हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढलो नाही. आता नको ती लोक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन डोक्यावर येऊन बसलेत. यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढणार. जिंकलो, हारलो तरी हिंदुत्वाला अंतर देणार नाही अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. 

गाईला मारणे पाप आहे त्याप्रमाणे थाप मारणेही पाप आहे. थापाबंदी करा. लोकांना भुलवून सत्ता मिळवणं पाप आहे असा टोला उद्दव ठाकरेंनी भाजपाला लगावला. 

संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले याचं श्रेय घेण्यावरुन सुरु असलेला वाद पाहून दुख झालं. कोरेगाव-भीमामधील घटना मन विषण्ण करणारी होती. कोरेगाव भीमा घटनेमागे अदृश्य हात कोणाचे आहेत सर्वांना माहित आहे. जेव्हा कधी हे हात सापडतील तेव्हा त्यांची होळी करु असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. आजही आपण भांडलो तर आज जो कोणी औरंगजेब टपून बसला असेल तो मराठी माणसाचे तुकडे करेल असं सांगत मराठी माणसांनी एकजूट राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. जातीपातीचं राजकारण केलं तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू असाही इशारा त्यांनी दिला. 0

यावेळी उद्धव ठाकरेंनी कन्नड गीत गाऊन कर्नाटकचे कौतुक करणा-या चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही टीका केली. अशी माणसे कर्नाटकात गेलेली बरी. अमित शहांमुळे चंद्रकांत पाटलांना लॉटरी लागली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. भाषेचा अनादर करत नाही. पण कानडी अत्याचाराचा विरोध करतो. माझ्या आईचा अनादर करुन दुस-याचा आदर करणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. 

गुजरातमध्ये प्रादेशिक पक्ष असता, तर जनतेने भाजप-काँग्रेस ऐवजी त्यांना पसंती दिली असती असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. जाहिरातबाजीवर चालणारं सरकार आपल्याला खाली खेचावंच लागेल असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.    

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानरेंद्र मोदी