Sandeep Deshpande BMC: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला निवडणुकीच्या निकालानंतर पहिला मोठा तडा बसल्याचे चित्र आहे. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. मनसेने ठाकरेंच्या कोट्यातून एक जागा मिळावी अशी मागणी केली असताना, उद्धव ठाकरे यांनी मात्र मनसेचा प्रस्ताव बाजूला सारून स्वतःच्या तीन निष्ठावंतांच्या नावांवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. यामुळे संतापलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर 'कोत्या मनाची प्रवृत्ती' अशी टीका केली आहे.
मुंबई महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. संख्याबळानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ३ जागा मिळणार आहेत. निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केल्यामुळे आणि अनेक ठिकाणी उमेदवारांसाठी प्रचार केल्यामुळे, या ३ पैकी १ जागा मनसेला मिळावी, असा आग्रह मनसेने धरला. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांची नावे दिल्याचे म्हटलं जात आहे.
संदीप देशपांडेंचे बोचरे स्टेटस
उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून या वादाला फोडणी दिली. त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये लिहिले की, "कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये." थेट नाव घेतले नसले तरी देशपांडे यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज-शिंदे भेटीने समीकरणं बदलली?
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट निवडणुकीनंतरची पहिलीच औपचारिक भेट होती. या भेटीनंतर ठाकरेंच्या गोटात हालचाली वेगवान झाल्या. उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवक पदाबाबत तातडीने निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. येत्या २५ फेब्रुवारीला या नावांची अधिकृत घोषणा होणार असली, तरी त्यापूर्वीच मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे युतीतील तणाव चव्हाट्यावर आला आहे.
Web Summary : Sandeep Deshpande criticized Uddhav Thackeray for allegedly denying MNS a BMC councillor seat after their alliance. MNS sought a seat from Thackeray's quota, but Thackeray reportedly nominated his loyalists, sparking anger and exposing tensions within the coalition ahead of official announcements.
Web Summary : संदीप देशपांडे ने उद्धव ठाकरे पर मनपा पार्षद सीट से वंचित करने का आरोप लगाया, जिससे गठबंधन में तनाव आ गया। मनसे ने ठाकरे के कोटे से सीट मांगी थी, लेकिन ठाकरे ने कथित तौर पर अपने वफादारों को नामित किया, जिससे गठबंधन में तनाव बढ़ गया।