Join us

रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:14 IST

Uddhav Thackeray And Rashmi Thackeray Visit Sanjay Raut Home: संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे घरी गेले होते.

Uddhav Thackeray And Rashmi Thackeray Visit Sanjay Raut Home: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीव राज्यातील राजकारणाला वेग येताना पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंचे एकत्र येणे, निवडणुकीसाठी युती होणार की नाही, याबाबतची साशंकता, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, विधान भवनात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी असे अनेक विषय राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. यातच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यानंतर आता उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले.

जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. यावेळी रश्मी ठाकरे यादेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. संजय राऊतांच्या आईची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, असे सांगितले जात आहे.

संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची मुलाखत

लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, ठाकरे गटाला पडलेले खिंडार, भाजपा महायुती अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरे यांनी मन की बात सांगितली. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले, हे लोकांसमोर आले. लाडकी बहीणसारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाली की स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचे म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष, हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलेलो आहोत. ठाकरे ब्रँड हा आम्ही तयार केलेला नाही. तो लोकांनी स्वीकारला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर जनतेशी प्रामाणिक आहोत. ठाकरे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. आपल्या वेदनेला निर्भीड वाचा फोडणारे आहेत, हे जनतेला माहित आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्याबरोबर आहे. ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मितेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच काम केले . आमची ही ओळख अनेकांनी पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमची ओळख पुसू इच्छिणारेच पुसले गेले. ज्यांच्याकडे काहीच नाही, जे पोकळ आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागत आहे. हेच ठाकरे ब्रँडचे वैशिष्ट्य आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतशिवसेना