Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:24 IST

मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुण्यात झालेल्या बहुचर्चित मुलाखतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत भाष्य केले. शरद पवार यांनी मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला होता. मात्र, बाळासाहेबांना 2000 साली अटक झाली तेव्हा शरद पवारांची ही आपुलकी कुठे गेली होती, असा सवाल उद्धव यांनी विचारला. बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. किंबहुना बाळासाहेबांना अटक होईल, यासाठी प्रयत्न केले, असा आरोप उद्धव यांनी केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल पुण्यात शरद पवारांची मुलाखत घेतली होती. प्रसारमाध्यमांनी या मुलाखतीविषयी उद्धव यांचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही, असे सांगत उद्धव यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

शरद पवार यांनी मुलाखतीत मुंबई, जातीपातीचे राजकारण आदी मुद्द्यांवर भाष्य केले होते. त्याबाबत विचारले असता, मुंबई तोडू देणार नाही असं काही जण सांगतात, पण गरज असल्यावर आम्ही ठाम आहोत. तुमच्याही काळात मुंबई तोडण्याचा प्रयत्न होत होता. त्यावेळीही शिवसेना ठामपणे उभी होती, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले. तसेच आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, हा विचार बाळासाहेबांनी यापूर्वीच मांडला होता. बाळासाहेबांची ही मागणी मान्य झाली असती तर आज जातीपातीच्या भिंती उभ्याच राहिल्या नसत्या, असे उद्धव यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशरद पवारराज ठाकरे