Join us

राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 07:48 IST

अयोध्येतील राम मंदिराचाही अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या एका वचनाची तरी पूर्तता करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  

मुंबई - तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर आता राम मंदिराचाही अध्यादेश काढा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  ''तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुस्लिम स्त्रीयांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही सूर्योदय होईल हे पाहावे. तलाकबंदी आणि तो गुन्हा ठरविण्याची वचनपूर्ती केलीत तसेच तीन दशकांपासून बाजूला टाकलेले राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा. अयोध्येतील राम मंदिराचाही अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या एका वचनाची तरी पूर्तता करा', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  

(Triple Talaq Ordinance: 'तिहेरी तलाक'विरोधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; गुन्हा ठरणार)

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :

-  अध्यादेशामुळे तोंडी तलाक थेट अजामीनपात्र गुन्हा ठरेल. त्यामुळे राजरोस तोंडी तलाक देण्याचे बेबंद धाडस करताना मुस्लिम पुरुष विचार करतील.

- धार्मिकदृष्ट्या असहाय्य असणाऱ्या मुस्लिम विवाहितांना निदान या अध्यादेशाचे संरक्षक कवच लाभेल आणि एका अनिष्ट रूढीपासून त्यांची मुक्तता होऊ शकेल.

-अयोध्येतील राम मंदिर निर्माण हे देखील तलाकबंदीचे श्रेय घेणाऱ्यांनीच हिंदूंना दिलेले आणि अद्याप पूर्ण न केलेले वचन आहे.

- तलाकबंदी केली, तिहेरी तलाक गुन्हा ठरवला तसेच आता अयोध्येतील राम मंदिराचेही निर्माण करा. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला. त्यांच्या मंदिर निर्मितीचा ‘वनवास’ कायमच का आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

- यापूर्वी आघाडीचे राजकारण असल्याने समान नागरी कायदा, 370 कलम आणि राम मंदिर ही तिन्ही वचने पूर्ण करता आली नाहीत हे जनतेने समजून घेतले आहे. मात्र आता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात तुमचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. तरीही प्रभू श्रीरामांचा वनवास का संपत नाही?

- राम मंदिर निर्माण हा निवडणुकीच्या आश्वासनाचा बुडबुडाच का ठरत आहे?

- तीन दशकांपासून बाजूला टाकलेले राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा. न्यायालय निकाल द्यायचा तेव्हा देईल, पण तमाम हिंदूंच्या या श्रद्धेच्या आणि भावनेच्या प्रश्नावरही आता तोडगा काढा, हीदेखील देशभावना आहे.

- तलाकबंदीसाठी जो कणखरपणा आणि निग्रह दाखवला तसाच राम मंदिरप्रश्नीही दाखवा. अयोध्येतील राम मंदिराचाही अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या निदान एका वचनाची तरी पूर्तता करा.

टॅग्स :राम मंदिरउद्धव ठाकरेतिहेरी तलाक