ठरलं! उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, खासदारांना मार्गदर्शन करणार; मातोश्रीवर बैठकांचे सत्र कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:56 IST2025-03-02T12:55:13+5:302025-03-02T12:56:54+5:30
Uddhav Thackeray News: आगामी मुंबई महापालिका निवडणूक काळात सर्व खासदारांनी मुंबईत यावे आणि प्रचार करावा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.

ठरलं! उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, खासदारांना मार्गदर्शन करणार; मातोश्रीवर बैठकांचे सत्र कायम
Uddhav Thackeray News: पक्षाला लागलेली गळती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर ठाकरे गट कमालीचा तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही करून मुंबई महापालिका हातून जाऊ द्यायची नाही, असा चंगच उद्धव ठाकरे यांनी बांधल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी उद्धव ठाकरे स्वतः आता मैदानात उतरणार आहेत. तसेच मातोश्रीवर आणि शिवसेना भवनात बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्धवसेनेचे लोकसभा आणि विधानसभानिहाय संपर्कप्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातील मतभेद दूर करण्याची जबाबदारी पक्षातल्या उपनेत्यांवर देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात राहून हे उपनेते आपला अहवाल त्यांना सादर करणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ९ मार्च रोजी ईशान्य मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी महाराष्ट्रात विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत.
उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, खासदारांना मार्गदर्शन करणार
शिंदे गटाकडून खासदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत असल्याने अधिवेशन काळात स्वत: उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार असून तिथे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली. खासदारांनी विषय ठरवून त्यांचा अभ्यास करून संसदेत त्यावर आवाज उठवावा, असे आदेश ठाकरे यांनी दिले असल्याचे समजते. या बैठकीत संसद अधिवेशनात ठाकरे गटाच्या खासदारांनी कोणते विषय मांडावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच एकाच व्यक्तीकडून पक्षाची भूमिका मांडली जाण्यापेक्षा सर्व खासदारांना बोलण्याची संधी मिळावी, याचे नियोजन केले जाणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे संसद अधिवेशन काळात दोन दिवसांसाठी दिल्लीत जाणार असल्याचे कळते.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबतही या बैठकीत बोलणी झाली. स्वतंत्र निवडणूक लढायची की आघाडी करायची याबाबत चर्चा झाली नसली तरी महापालिका निवडणूक काळात पक्षाच्या सर्व खासदारांनी मुंबईत यावे आणि मुंबईत राहणाऱ्या आपापल्या भागातील नागरिक, मतदारांशी संपर्क साधून प्रचार करावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.