Join us  

उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्त्ववादी, मग वंचितसोबत युती कशी? शिंदेंच्या आमदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 4:03 PM

शिवसेनेत मोठं बंड झालं  दोन गटात शिवसेना विभागली गेली तरी अजूनही हे वाद सुरूच आहेत.

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. त्यानंतर, भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सातत्याने टीका होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर काय वेळ आली, असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. आता, शिंदे गटातील आमदारानेही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. हिंदुत्त्ववादाच्या मुद्द्यावरुन आमदार विश्वनाथ भोईर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

शिवसेनेत मोठं बंड झालं  दोन गटात शिवसेना विभागली गेली तरी अजूनही हे वाद सुरूच आहेत. एकीकडे शिंदे गटात एकेकजण प्रवेश करताना दिसत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटानेही पक्ष वाढीसाठी  कंबर कसली आहे. त्यातूनच, शिवसेना आणि वंचितची युती झाली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी या युतीवरुन शिवसेनेवर निशाणा साधला. होता. आता, शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनीही उद्धव ठाकरेंना वंचित सोबतच्या आघाडीवरुन लक्ष्य केलं आहे. 

सर्वजण शिंदे गटात येत आहेत, त्यामुळे ठाकरेंकडे कोणता नेताच उरला नाही. ठाकरेंकडे आता कोणताच उद्योग राहिला नाही. त्यामुळे ते रोज एकेकाला प्रवेश देत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना नेमवण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे, असा आरोपही शिंदे गटाचे नेते आणि कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरे हे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात, मग प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती कशी काय? असा सवाल उपस्थित करत ही युती म्हणजे संशोधनाचा विषय आहे, असेही भोईर यांनी म्हटले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेआमदार