CM Devendra Fadnavis And Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानिमित्ताने विधान परिषदेमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषद सदस्य, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झाली. या सर्वांनी अंबादास दानवे यांच्या कामगिरीचा गौरव केला. यावेळी विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली. याला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेळोवेळी बोचरी टीका करत असतात. विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवाद झाला. विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्यासाठी थेट ऑफर दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी, सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला २०२९ पर्यंत तिकडे येण्याची संधी नाही. मात्र तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे. त्याचा विचार करता येईल. त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.
उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरवर प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्या आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.
दरम्यान, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभ पार पडल्यानंतर विधिमंडळ परिसरात परंपरेप्रमाणे फोटोसेशन झाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच सर्वांच्या नजरा होत्या. सुरुवातीला सत्ताधाऱ्यांसोबत फोटोसेशन पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहात अध्यक्ष यांच्यासह सर्व प्रमुख नेते उभे राहिले. परंतु, उद्धव ठाकरे नेमके कुठे बसणार, याकडे उपस्थितांसह सर्वांच्या नजरा खिळल्या. उद्धव ठाकरे पुढे आले, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी नजर देणेही टाळले. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. नीलम गोऱ्हे एकडे बसा म्हणून आग्रह करत होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना नकार दिला. त्यानंतर ते नीलम गोऱ्हे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेजारी जाऊन बसले. मात्र यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकांना पाहिलेही नाही किंवा संवादही साधला नाही. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.