“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:25 IST2025-11-16T16:21:48+5:302025-11-16T16:25:50+5:30
Uddhav Thackeray On Bihar Election Result 2025: ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, त्यांचे सरकार येते. लोकशाहीचे हे गणित कळण्याच्या पलीकडचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Uddhav Thackeray On Bihar Election Result 2025: आपले मुख्यमंत्री म्हणाले की, जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचे राज आजपर्यंत कोणी समजू शकले नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन. पण, एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता, मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होती, हे आता कळेना झाले, अशी खोचक प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, त्यांचे सरकार येते. या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलीकडचे आहे. बिहारमध्ये महिलांना जे १० हजार रुपये देण्यात आले, हा एक फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असे वाटत नाही. पण आता ठीक आहे की, जो जीता वही सिकंदर, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचा पक्ष आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे
मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. माझा पक्ष स्वतंत्र आहे. त्यांचा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे आणि आमचा पक्ष आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. भाजपा प्रादेशिक पक्ष संपवायला निघाला आहे. भाजपाला राष्ट्रगीत शिकवले पाहिजे. त्यात पंजाब, सिंध, महाराष्ट्र आहे. या प्रादेशिक अस्मिता मारायला भाजपा निघाला आहे. अनेकतेत एकता आहे. ती एकता मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप ठाकरेंनी केली.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे.